शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना गुडघे टेकायला लावणार! नाशिकच्या विराट सभेत उद्धव ठाकरे कडाडले

>> बाबासाहेब गायकवाड

गुजरातमध्ये कांदा निर्यातीला परवानगी दिली आणि महाराष्ट्रात मात्र कांद्यावर निर्यातबंदी लादली. हा भेदभाव का? असा भेदभाव करत असाल तर महाराष्ट्र तुम्हाला पुन्हा गुजरातमध्ये पाठवून द्यायला पुरेसा आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांवर अत्याचार करणाऱयाचे हातपात तोडले जायचे. आज मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे गेले नाहीत. हजारो महिलांवर अत्याचार करणाऱया प्रज्वल रेवण्णासाठी मते मागत आहेत. अशा मोदींच्या डोक्यावर प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप घातला हा शिवरायांचा अवमान आहे आणि महाराष्ट्रात शिवरायांचा अवमान करणाऱ्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही, याद राखा, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावून सांगितले.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती. या विराट सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसह अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचाही ठाकरी भाषेत समाचार घेतला.

काही पावटे शिवसेनेला नकली म्हणतात…

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः शिवसेनेची जबाबदारी माझ्याकडे सोपवली होती. तरीही काही पावटे… त्याच्याआधी एक शब्द जोडतात पण मला जोडायचा नाही. पावटय़ाचा गुणधर्म सर्वांना माहीत आहे. ते पावटे शिवसेनेला नकली म्हणत आहेत. त्यांना कुठे मोड फुटलेत माहीत नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका केली. मोदी झोपत नाहीत असे सांगतात, झोप अपुरी झाली की माणसाच्या मेंदूवर परिणाम होतो आणि तो भ्रमिष्टासारखा बोलायला लागतो, असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मोदी नकली संताने दत्तक घेतात

प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांना जिरेटोप घालून शिवरायांचा अवमान केल्याची भावना महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात पटेल यांच्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे. त्या घटनेचा धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी यावेळी मोदींसह पटेल यांचाही शेलक्या शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले की, एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि नकली संताने दत्तक घ्यायची, तशीच एक वाह्यात संतान मोदींनी मांडीवर घेतली आहे, तिचे नाव प्रफुल्ल पटेल. जरी तुम्ही पटेल असाल तरी असे काही कराल तर जनता तुम्हाला आपटेल, असे सांगतानाच, जिरेटोप कुणाच्या डोक्यावर ठेवता? मोदींच्या? त्यांची पात्रता काय महाराजांची बरोबरी करण्याची? थोडी तरी पात्रता आहे का? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी पटेल यांना उद्देशून केला.

इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचे अनेक चेहरे आहेत, दरवर्षी नवा पंतप्रधान करतील अशी टीका पंतप्रधान मोदी आमच्यावर करतात. होय, आमच्याकडे चेहरे आहेत, तुमच्याकडे तर चेहराच नाही. दोन वर्षानंतर भाजपची अवस्था काय होईल ते पहाच. 5 जूनलाच अर्धाअधिक भाजपा फुटल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर जे उंदीर भाजपात पळाले आहेत त्यांच्या शेपटय़ा कशा पकडतो ते पाहा, असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकऱ्यांची ताकद दाखवून द्या

गद्दारी केली म्हणून नाशकातल्या एका कांद्याला भाजपने खोके दिले. आता शेतकरी बनून तुमची ताकद मोदी सरकारला दाखवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी नाशिकमधील शेतकऱयांना केले. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱयांच्या हिताचे निर्णय प्राधान्याने घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा अभिवचनाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

मोदींच्या सभा तिथे भाजपचा सुपडा साफ

गेल्या निवडणुकीत मोदींनी 200च्या वर सभा घेतल्या. जिथे गेले तिथे भाजपचा सुपडा साफ झाला. त्यांनी नाशिकमध्ये यावे आणि इतरही ठिकाणी जावे म्हणजे भाजपचा सुपडा साफ होईल. महाराष्ट्राने भाजपला 40 पेक्षा जास्त खासदार देऊन मोदींवर उपकार केली, त्याची परतफेड उपकाराने करता? मोदी आज मतांची भीक मागत आहेत. दहा वर्षे त्यांनी जनतेला फसवले पण आता महाराष्ट्र फसणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी बजावून सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मुलाखत दिली. त्यांना इतके गहिरवरून आले होते की पाठोपाठ लोक नॅपकीन घेऊन उभे होते. गंगा मैय्याने मला 2014 मध्ये वाराणसीत बोलवले होते असे मोदी म्हणाले होते. गंगा मैय्याने आपल्याला दत्तक घेतलेय असेही मोदी म्हणाले होते. मग कोरोना काळात गंगेमध्ये प्रेते सोडली जात होती, गंगा रडत होती तेव्हा तिचे अश्रू का पुसले नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी मोदींना केला.

यावेळी उमेदवार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, राष्ट्रवादीचे नितीन भोसले, संभाजी ब्रिगेडचे गंगाधर बनबरे, काँग्रेसच्या हेमलता पाटील, अर्जुन डांगे, आमदार हिरामण खोसकर आदींची भाषणे झाली.

यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उपनेते सुनील बागुल, उपनेत्या निर्मला गावीत, शुभांगी पाटील, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, नितीन आहेर, गणेश धात्रक, कुणाल दराडे, आमदार नरेंद्र दराडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, अनिल कदम, योगेश घोलप, महानगरप्रमुख विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, विनायक पांडे, काँग्रेसचे हिरामण खोसकर, वत्सला खैरे, हेमलता पाटील, आकाश छाजेड, संदीप गुळवे, राष्ट्रवादीचे नितीन भोसले, शैलेश ढगे, माकपाचे डी. एल. कराड, तानाजी जायभावे आदी उपस्थित होते.

इंडिया आघाडीकडे चेहरे किती आहेत विचारता. तुमच्याकडे चेहराच नाही. दोन वर्षानंतर मोदी झोळी घेऊन निघून जातील तेव्हा भाजपची काय अवस्था होतेय ते बघा. शिवसेनेची काळजी करू नका. आई जगदंबा आहे पाठिशी, ती समर्थ आहे. भाजपवालेच सांगत होते की मोदी जिथे आले तिथे त्यांचा सुपडा साफ झाला. अजून दोन दिवस राहिलेत. नाशिक व अन्य ठिकाणीही या म्हणजे सगळीकडून तुमचा सुपडा साफ होईल.

नाशकात उतरवलेल्या बॅगा कुठे पोहोचवल्या?.. उत्तर द्या!

नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून बॅगा उतरवल्याच्या शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या ट्विटनंतर मिंधे गट आणि भाजपात चलबिचल झाली होती. त्या मुद्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाष्य केले. बॅगा कुठे पोहोचवल्या त्याचे उत्तर द्या, असे ते म्हणाले. अशा बॅगा पोहोचवल्या जात असताना ईडी आणि सीबीआयवाले कुठे चाखना खात बसले होते? की चुना मळत होते की मशेरी लावत बसले होते? असा सवालही त्यांनी केला.

5 जूनला अर्धाअधिक भाजपा फुटलेला असेल

शिवसेना निवडणुकीनंतर कॉंग्रेसमध्ये विलिन होईल अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. गेली 30 वर्षे शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत होती. भाजपकडून दगाफटका खाऊनही शिवसेना भाजपसोबत राहिली पण भाजपमध्ये गेली नाही. मग कॉंग्रेसमध्ये कशी जाईल? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मोदीजी, तुम्ही भाजपची चिंता करा, दोन वर्षानंतर भाजपची काय अवस्था होते ते बघा, 5 जूनलाच अर्धाअधिक भाजपा फुटलेला असेल, असे भाकीतही त्यांनी वर्तवले.

चपराशी झालो तरी चालेल मी पुन्हा येईन

उद्धव ठाकरे यांनीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री बनवायचेय आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचेय असा आरोप भाजपा नेते अमित शहा यांनी केला होता. मोदीजी, आम्ही आमच्या मुलांना मुख्यमंत्री करायला लढतोय तर मग तुम्ही किती दिवस बोहल्यावर चढणार. दुसरेही आहेच पुन्हा येईन म्हणणारे. मुख्यमंत्री होतो चपराशी झालो तरी चालेल पण मी पुन्हा येईन. अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवताच एकच हशा पिकला.

मोदींची घमेंड उतरवण्याची हीच वेळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घमेंड उतरवण्याची वेळ आली आहे. जनताच त्यांना सत्तेतून खाली खेचणार आहे, असा विश्वास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. मोदी यांनी आज पिंपळगावच्या सभेत कांदा प्रश्नावर बोला म्हणणाऱया तरुण शेतकऱयाकडे रागाने पाहीलं आणि भारत माता की जय, जय श्रीराम घोषणा देऊन निघून गेले. जर तुम्ही प्रश्नच सोडवू शकत नसाल, तर तुमच्यासारख्या थापाडय़ांची देशाला गरज नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी मोदींना सुनावले. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर नाशिकला उतरलं, त्यातून 19 बॅगा उतरवल्या, हा तुमचा पापाचा पैसा आमचा पराभव करू शकत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र क्रांतीच्या दिशेने निघाला आहे. भ्रष्टाचाराचा वापर करून पक्ष पह्डणाऱया, महाराष्ट्राचा अपमान करणाऱया मोदी-शाह यांच्याविरुद्ध मशाल पेटली आहे. महाराष्ट्रातही पुढच्या चार महिन्यांत सत्ता बदल होऊन शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सत्तेत येईल, असेही ते म्हणाले.

पटेलांनाही कळली मोदींची लायकी

कुणाच्याही डोक्यावर जिरेटोप घालणे हा महाराष्ट्राचा व महाराजांचा अवमान आहे. पटेल यांनी आज चूक मान्य केली म्हणजेच त्यांनाही कळले की जिरेटोप घातलेले डोके त्या लायकीचे नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱयांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका असे सांगणारे महाराज कुठे आणि नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱयांचे हाल करणारे कुठे, असेही ते पुढे म्हणाले.