आठवणीतील विद्यार्थी

1206

>> मं. गो. राजाध्यक्ष

सर जे. जे. उपयोजित कला संस्थेत अध्यापक म्हणून कार्यरत असताना मं. गो. राजाध्यक्ष यांना शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विद्यार्थीदशेतील प्रवास पाहता आला. या प्रवासातील या काही आठवणी…

शिक्षकी पेशातील लोकांना एक गोष्ट फायद्याची असते. त्यांच्या हाताखालून अनेक विद्यार्थ्यांच्या पिढय़ा पुढे सरकत असतात. त्यापैकी कित्येक विद्यार्थी त्यांच्या भावी आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत नावारूपाला येतात. चित्रकलेसारख्या नैपुण्य क्षेत्रात असलेले विद्यार्थी कलेच्या निरनिराळ्या दालनात आपले प्रावीण्य दाखवितात. यातले काही विद्यार्थी आपल्या शिक्षकांचे ऋण मानतात. कारण शिक्षकांनी त्यांच्यावर संस्कार घडवलेले असतात, त्यांना ज्ञानदान केलेले असते. काही वेळा एखादा विद्यार्थी नावारूपाला आला की, तो आपला विद्यार्थी होता असे एखादा शिक्षक त्याचे गुणगान गात असतो, पण काही विद्यार्थी मात्र त्यांच्या शिक्षकांच्या आयुष्यात केवळ अविस्मरणीय असतात.

मी सर जे. जे. उपयोजित कला संस्थेत अध्यापक म्हणून कार्यरत असताना माझ्या कानांवर आले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आपल्या महाविद्यालयात शिकतो आहे. बहुधा ते 1976 साल असावे. शिवसेना त्या काळात अत्यंत प्रभावी अशी संघटना होती. शिवसेनाप्रमुखांच्या एखाद्या लहानशा गोष्टीचे पडसादही सर्वत्र उमटत असत, पण त्यांचा मुलगा आपल्या संस्थेत दोन वर्षे असूनही माझ्या प्रत्यक्ष पाहण्यात आला नव्हता. अर्थात आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, विशेषकरून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना वर्गकामातून डोके वर काढण्याचीही फुरसत मिळत नसे. त्यामुळे तो बाहेर दिसण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. नंतर कधीतरी गेटटुगेदरच्या वेळी अचानक दिसला तेव्हा मला कळले की, हाच तो बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा उद्धव! शरीरयष्टीने बारीक, उंचापुरा, वर्णाने गोरापान, डोळ्यांवर चष्मा आणि चेहऱयावर सतत एक स्मित हास्य बाळगणारा असे त्याचे व्यक्तिमत्त्व होते.

ut-saheb-photography

दुसऱयाच वर्षी म्हणजे द्वितीय वर्षाला उद्धव माझ्या वर्गात आला. त्याच्या मित्रमंडळीत आजूबाजूला होते ते सर्व विद्यार्थी कामात तसेच माहीर होते आणि उद्धवदेखील त्याच प्रवृत्तीचा होता. संजय सुरे, भूपाल रामनाथकर, अजित जयकर, भास्कर हांडे, सतीश सोनवणे हे उद्धवचे मित्र होते, पण या सर्वांमध्ये चुरस असे ती कामाची. उपयोजित कलेमध्ये केवळ चित्रे काढून भागत नाही तर त्यामध्ये संवाद साधण्याची कल्पकता असावी लागते. त्यासाठी कलेसोबतच वाचन, निरीक्षण, काव्य, लेखन अशा सर्वच बाबींवर विचार करावा लागतो व येथेच विद्यार्थ्यांना शिक्षक मार्गदर्शन करतो. उद्धव माझ्या संपर्कात आला तेव्हा सर्वात महत्त्वाची बाब माझ्या लक्षात आली ती म्हणजे त्याचे बोलणे. एरवी अत्यंत अबोल वाटणारा उद्धव एखाद्या विषयावर बोलू लागला अथवा वादविवाद करू लागला की, संपूर्णपणे वातावरण बदलून टाकत असे. त्याचा गंभीर वाटणारा चेहरा नर्मविनोद पेरत असे तेव्हा त्याच्या चेहऱयावर एक मिष्कील हास्य पसरत असे. शांतपणे त्याचे संभाषण चालू असे.

सर्वांशीच मनमोकळेणाने वागणारा उद्धव प्रत्येक शिक्षकालाही अदबीने मान देत वागत असे. आपण केलेल्या कामावर शिक्षकांशी सांगोपांग चर्चा करून किती निरनिराळ्या तऱहेने त्या कल्पना चित्रांकित केल्या जातील याची तो चर्चा करे. शिक्षकही त्याला कधीच वेगळी वागणूक देत नसत व उद्धवची तशी अपेक्षाही नसे. उद्धवचा वाखाणण्याजोगा गुण म्हणजे त्याचा वक्तशीरपणा व कामातील बैठक. राज्य कला प्रदर्शनाची वेळ असे तेव्हा आम्ही सर्वच विद्यार्थ्यांना झटून कामाला लावत असू. यावेळी महाविद्यालयीन वेळेव्यतिरिक्त आम्ही रोज विद्यार्थ्यांसोबत उशिरापर्यंत काम करीत बसत असू. उद्धवचा याबाबतीत पुढाकार असे. इलस्ट्रेशन हा उद्धवचा खास आवडीचा विषय. त्यात त्याची गतीही चांगली होती, पण आपले इलस्ट्रेशन केवळ कामचलाऊ असू नये तर ते सर्वांगदृष्टय़ा परिपूर्ण व्हावे याकडे त्याचा कटाक्ष असे. त्यासाठी त्याची सतत मेहनत, जोपासना व तपश्चर्याही सुरूच असे.

उन्हाळ्याच्या संपूर्ण सुट्टीत तो दादरला सुप्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांच्याकडे जाऊन उमेदवारी करत असे. विद्यार्थ्यांच्या कामाची बैठक पक्की असेल तरच परांजपे यांच्याकडे काम करण्याचा लाभ मिळत असे, अन्यथा तिथे कोणालाही थारा नसे. तिथे उद्धवने स्वतःचे ड्रॉइंग अधिक उठावदार, निर्दोष कसे करावे याचे पुरेपूर शिक्षण घेतले. छायाचित्रण हादेखील उद्धवचा आवडीचा विषय. किंबहुना ड्रॉइंग चांगले असूनही छायाचित्रणाच्या आवडीने उद्धवने ती कलाही आत्मसात केली. त्यासाठी तो तासन्तास कॉलेजच्या डार्करूममध्ये व नंतर दादरला जतकर सरांच्या डार्क रूममध्ये घालवीत असे. छायाचित्रणामध्ये निरनिराळे प्रयोग करणे, बाह्य चित्रण करणे, निसर्ग व प्राणिजीवनाचे चित्रण करणे हे उद्धवच्या खास आवडीचे असे विषय. पशू आणि पक्ष्यांच्या सान्निध्यात तो रमून जात असे. फिल्टर, अपार्चर, डायफ्रॅम, लाइट असे विषय त्याचे जिव्हाळ्याचे असत. तो केवळ कॅमेऱयाने चित्रण करीत नसे तर त्याची सर्जनशील दृष्टी सौंदर्य शोधून त्यातून तो चित्रनिर्मिती करीत असे. त्यामुळे त्याची छायाचित्रे बोलकी होत असत. त्याने गच्चीवर बाळासाहेबांचा काढलेला फोटो मी माझ्या एका बाळासाहेबांवरील लेखासाठी वापरला होता. माझी बाळासाहेबांशी आधीची ओळख होतीच, पण उद्धवने त्यांना आपले शिक्षक म्हणून माझी जेव्हा खास ओळख करून दिली, तसेच माझ्या उपक्रमाविषयी तो अनेकदा त्यांच्याकडे बोले, त्यामुळे मी साहेबांशी जास्तच जवळ आलो. त्यामुळे माझी कोणाशीही ओळख करून देताना ‘माझ्या उद्धवचे सर’ म्हणून ते करून देत असत.

बघता बघता अंतिम वर्ष आले. परीक्षा आटोपल्या. अंतिम वर्षाच्या परीक्षेत विशेष गुणवत्तेने उद्धव उत्तीर्ण झाला. परीक्षा होताच सर्व विद्यार्थी मोठमोठय़ा जाहिरात संस्थेमध्ये काम करण्यास उत्सुक असतात. गुणवत्तेच्या जोरावर उद्धवलाही हे सहज शक्य होते, पण तिथेही त्याने अचूक निर्णय घेतला. कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा त्याने स्वतःची जाहिरात संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. ‘चौरंग’ हे समर्पक नाव तिला दिले. या कामाच्या फुरसतीच्या क्षणी उद्धवचे छायाचित्रण सुरूच होते. वन्य जीवनाचे चित्रण करताना त्याला आलेले अनुभव ऐकताना अंग थरारून येत असे.

पुढे शिवसेनेचे विचार इतर वृत्तपत्रे मांडत नाहीत म्हणून बाळासाहेबांनी स्वतःचे मुखपत्र काढायचे ठरवले. ‘सामना’ हे नामकरणही झाले. यावेळी बाळासाहेबांना गरज वाटू लागू लागली ती विश्वासू अन् हक्काच्या माणसांची. त्यावेळी उद्धव आणि राज दोघेही ‘सामना’चे काम पाहत. तिथून पुढे बाळासाहेबांनी उद्धववर अनेक जबाबदाऱया टाकण्यास सुरुवात केली. त्या सर्व निभावत उद्धवने स्वतःमधील सर्जनशील कलावंत जपून ठेवला. कामाच्या रगाडय़ातही त्याची छायाचित्रण कला बहरत होती. पुढे शिवसेना राज्यात सत्तेवर आली तेव्हा उद्धवचा दिनक्रम एकदमच बदलला. त्याला स्वतःचे असे खासगी जीवन राहिलेच नाही. त्याचा मुक्काम सेनाभवनवर जास्त राहिला. सतत लोकांचा गराडा, त्यांचे प्रश्न सोडवणे यामध्ये उजाडलेला दिवस कसा मावळला जाई याची खुद्द त्यालाच कल्पना नसे. त्यातूनही आम्ही काही खास अशी प्रदर्शने भरवत असू त्या वेळी उद्धवने त्यांना भेटी देऊन अगदी मार्मिकपणे त्याचा आस्वाद घेतला आहे. ‘‘ज्या वेळी आपण केलेल्या कलाकृती लोकांना दाखविण्यायोग्य तुला वाटतील त्याच वेळी त्यांचे प्रदर्शन कर!’’ हा बाळासाहेबांचा सल्ला मानत उद्धवने वन्य प्राणी जीवनाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरवले. यातील कलाकृती पाहताना त्याच्यातील कलासाधनेचे प्रत्यंतर ठायी ठायी येत होते.

त्यानंतरही त्याने आपले प्रदर्शन भरवले. ते छायाचित्रांचे प्रदर्शन पाहताना उद्धवच्या कल्पक अशा सर्जनशीलतेची जाणीव सतत होत होती. पुढे 2004 मध्ये उद्धवने आपले गडकिल्ल्यांचे प्रदर्शन भरविले. आपल्या शेवटच्या प्रदर्शनात उद्धवने हाताळलेला एक नवा प्रकार म्हणजे ‘इन्फ्रारेड’ छायाचित्रण. इन्फ्रारेड हा नेहमीचा प्रकार नसून हा कॅमेराबद्ध होतो. त्यामुळे छायाचित्रांची रंगसंगती अधिक खुलून येते. छायाचित्रात टायमिंग हे अचूक आणि महत्त्वाचे असते असे त्याचे म्हणणे आहे. जेव्हा उद्धवसारखा कलावंत आपले कौशल्य वापरतो तेव्हा त्याचे पेंटिंग बनते. याशिवाय लतादीदी, सनईवादक बिस्मिल्ला खान, संतूरवादक शिवकुमार शर्मा, पाठमोरे जाणारे रतन टाटा यांच्या भावमुद्रा तितक्याच विलोभनीय त्याने टिपल्या आहेत.

एकदा मी टॅक्सीने जात असताना बीकेसीच्या सिग्नलजवळ आमच्या टॅक्सीशेजारीच उद्धव ठाकरे याची गाडी थांबली. मला पाहताच त्याने सांगितले की, उद्या नेहरू सेंटरमध्ये या. तिथे राजेंद्र गोळेचे पेपर स्कल्प्चरचे प्रदर्शन आहे. तसेच माझे नवीन पंढरपूरच्या वारीवरील पुस्तकदेखील तुम्हाला द्यायचे आहे. दुसऱया दिवशी मी तेथे गेलो तेव्हा अनेक चॅनलवाले उद्धवची वाट पाहत उभे होते, पण उद्धवने नम्रपणे त्यांना जाणीव करून दिली की, आज मी फक्त कला प्रदर्शनासाठी आलो आहे. राजकारणावर मी चुकूनही बोलणार नाही असे सांगून त्यांना माघारी पाठवले. आम्ही आत गेलो. सर्व प्रदर्शन पाहून झाल्यावर उद्धवने मला पुस्तक दिले. त्यावेळी मी कला विषयावर बरेच लिखाण करीत असे ते बाळासाहेबांपासून उद्धवला माहीत होते. ते पुस्तक ‘प्रबोधन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध झाले. उद्धवचे सचिव हर्षल प्रधान, भूपाल रामनाथकर, सेनाभवनचे कलाकार, लेखक व कवी अमोल मटकर यांनी या माझ्या ‘कॅलिडोस्कोप’ या पुस्तकाची देखणी रचना केली. माझा मुलगा हर्षद याने त्याचे सुंदर असे मुखपृष्ठ तयार केले.

आज उद्धव राजकारणात खूप पुढे गेला आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. आता तर तो या हिंदुस्थानातील संतांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्र भूमीचा मुख्यमंत्री म्हणून निवडला गेला आहे. हा आम्हा सर्वांचा गौरवाचा, मानाचा आणि मांगल्याचा क्षण आहे. एवढे अमाप यश मिळवूनही उद्धव ठाकरे या प्रसिद्धीच्या कळसावर पोहोचलेल्या व्यक्तिमत्त्वात तोच उद्धव आहे. त्याने स्वतःतील माणूस अन् कलावंत यांची जपणूक केली आहे. असे म्हणतात की, प्रत्येक जण आयुष्यात विद्यार्थीच असतो. उद्धव ठाकरे अजूनही ती भूमिका बजावत आहे. हे केवळ कौतुकास्पदच नव्हे, तर अनुकरणीय आहे.
पुढील यशस्वी आणि नेत्रदीपक वाटचालीसाठी आपणांस लक्ष लक्ष शुभेच्छा!

(लेखक सर जे. जे. उपयोजित कला महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता होते.)

आपली प्रतिक्रिया द्या