उद्धव ठाकरे नियमित तपासणीसाठी रुग्णालयात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नियमित वैद्यकीय तपासण्यांसाठी आज सकाळी ग्रॅण्ट रोड येथील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले. तज्ञ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी व आवश्यक चाचण्या करण्यात आल्या.

काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांची ऑन्जियोप्लास्टी झाली होती. कोरोना काळात त्यांच्या मानेवरही शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांना नियमित तपासणी व चाचण्या करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार आज त्यांचे रुटीन चेकअप करण्यात आले.

उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच शिवसैनिकांनी रुग्णालयाजवळ गर्दी केली होती. मात्र काळजीचे काही कारण नसल्याचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर शिवसैनिक माघारी परतले.

ऑल इज वेल’ – आदित्य ठाकरे

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. ‘उद्धव ठाकरे यांना पूर्वनियोजित वैद्यकीय तपासण्यांसाठी सर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांच्या शुभेच्छांमुळे ऑल इज वेल आहे. लवकरच ते जनतेच्या सेवेसाठी पुन्हा दाखल होतील,’ असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.