हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हे दाखल करा! उद्धव ठाकरे यांनी सरकारला ठणकावले

39

सामना ऑनलाईन,नाशिक/शिर्डी

शेतकरी त्याच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देतो पण या शेतकऱ्यांवर सरकारने गुन्हे दाखल केले, खोटय़ा केसेस लावल्या. राज्यात ज्या ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले त्यांची यादी द्या. ते गुन्हे मागे घेतल्याशिवाय सरकारला मी स्वस्थ बसू देणार नाही असे बजावतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनात मी त्यांच्या पाठीशी आहे, हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा असे ठणकावले.

राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी संप पुकारला. त्याचा केंद्रबिंदू ठरलेल्या पुणतांबा येथील शेतकऱ्यांचे राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने ऋण फेडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज नाशिक ते पुणतांबा असा झंझावाती दौरा केला. ठिकठिकाणी शेतकरी त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. भगवे झेंडे, भगव्या कमानी उभारून उद्धव ठाकरे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.

गुन्हे दाखल झालेले शेतकरी गळय़ात फलक घालून भरवस फाटा येथे उपस्थित होते. त्यांना जवळ बोलावून उद्धव ठाकरे  यांनी त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतला आणि शेतकरी आंदोलनामागे राजकीय पक्षांचा हात आहे अशी टीका करणाऱ्यांना हा फोटो दाखवा असे सांगितले. मुख्यमंत्र्यांना सांगा, मी सदेह या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

सरकारच्या मानगुटीवर बसू

दीड लाखापर्यंतची कर्जमुक्ती ही चांगली सुरुवात आहे, पण ज्यांनी आंदोलनाची ठिणगी टाकली, ज्यांच्या एकजुटीमुळे सरकारला झुकावं लागलं त्या नाशिक-नगरच्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा फायदा होणार नाही, जे वंचित राहतील त्यांच्यासाठी शिवसेना सरकारच्या मानगुटीवर बसेल आणि न्याय मिळवून देईल अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिली. तुम्ही सरकारला नाही तर भगव्याला मत दिले आहे, तुमचे ते मत वाया जाऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मागण्या मान्य करण्यास सरकारला भाग पाडणार

कांद्यासह सर्व शेतपिकाला हमीभाव मिळालाच पाहिजे असे सांगून ते म्हणाले की, स्वामीनाथन यांचे नाव आम्ही राष्ट्रपती पदासाठी सुचविले, मात्र त्यांची प्रकृती ठीक राहत नाही म्हणून त्यांचे नाव मागे पडले. मात्र स्वामीनाथन आयोग आम्ही विसरलो नाही. हा आयोग लागू करून त्यानुसार सरकारला शेतमालाला हमीभाव द्यावाच लागेल असे त्यांनी ठामपणे सांगितले. नियमित कर्ज भरणाऱ्यांना २५ हजारांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे ते वाढवून देण्यासाठी, तसेच कर्जमुक्ती जून २०१६पर्यंत दिली आहे ती जून २०१७पर्यंत कशी देता येईल यासाठीही प्रयत्न करू यासह अन्य मागण्या मान्य करण्यास सरकारला भाग पाडू, असेही ते म्हणाले.

श्रेय तुमचेच

‘‘शेतकऱयांच्या प्रश्नांवर यापूर्वीचे काँग्रेस आघाडी सरकार गंभीर नव्हते. त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर घरी बसण्याची वेळ आली’’ असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘आता भाजपमधील नेतेसुद्धा शेतकऱ्यांना अपशब्द वापरू लागले आहेत. ‘रडतात साले’ इथपर्यंत म्हणण्याची त्यांची मजल गेली आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याच्या व्यथा कधी तुम्ही जाणून घेतल्या का? हा शेतकरी एकवटून त्याने फक्त चुणूक दाखविली आहे. शेतकरी व संप कधी विषय माहीत होता का? पण पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी एकवटून लढा उभा केला. तो लढा राज्याला नाही तर देशाला दिशा देणारा ठरला. शिवसेनेने ‘सातबारा कोरा करा’ अशी भूमिका मांडली होती. आपण फक्त त्यांना पाठिंबा दिला होता. मिळालेले श्रेय फक्त तुमचेच आहे’’ असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

त्यांनी ऐकले नाही म्हणून तुम्हाला बसवले

‘‘आज शेतकऱ्यांना वळ उठेपर्यंत मारले, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. हे सरकारकडून अपेक्षित नाही. मागच्या सरकारने शेतकऱयांचे ऐकले नाही तर त्यांना हद्दपार केले. म्हणून आता तुम्हाला बसविले. मग शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही जाणणार की नाही? शेतमालाला हमीभाव, चढता भाव दिला जात नाही. शेतकरी कसाबसा उभा राहिला तर नोटाबंदीचा निर्णय घेतला गेला. शेतकऱयांचे पैसे जिल्हा बँकांमध्ये अडकून पडलेत. ज्या ज्या बँकांमध्ये घोटाळे झालेत, ज्यांनी घोटाळे केलेत त्यांना फासावर लटकवा पण सर्वसामान्य शेतकऱयांचे पैसे सडू देऊ नका. जिल्हा बँकांना लावलेले टाळे आम्ही काढायला सांगितले, कारण येथे शेतकऱयांचा पैसा अडकला होता. शेतकरी आपल्या कष्टातून पैसा गोळा करतो. मग शेतकऱ्यांचा पैसा ‘काळा’ की ‘गोरा’ हे ठरविणारे तुम्ही कोण’’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही!

समृद्धी महामार्गात तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही असे वचन उद्धव ठाकरे यांनी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिले, मात्र शेतकऱ्यांनीही या प्रश्नी एकजूट ठेवावी असे आवाहनही त्यांनी केले.  ‘समृद्धी’बाधित शेतकरी व समृद्धी महामार्गविरोधी संघर्ष समिती कोपरगावच्या वतीने उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

म्हणून हा निर्णय ऐतिहासिक

या निर्णयाचा सर्वाधिक फायदा विदर्भ आणि मराठवाडय़ाला झाला असला तरी तोही आपलाच भाग आहे. संपूर्ण महाराष्ट्र आपला आहे, तेथेही मी जाणार आहे. कर्जमुक्तीचे श्रेय मला घ्यायचे नाही, शेतकऱयांच्या एकजुटीचे आणि शिवसेनेने पंधरा वर्षांपासून दिलेल्या लढय़ाचे व पाठपुराव्याचे हे यश आहे. यामुळे हा निर्णय ऐतिहासिक आहे, असेही ते म्हणाले. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी, संपर्कप्रमुख सुहास सामंत, आमदार सुनील शिंदे, खासदार हेमंत गोडसे आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या