मेट्रोमुळे अग्यारींना धोका पोहोचू देणार नाही!; उद्धव ठाकरेंचं आश्वासन

32

सामना प्रतिनिधी । मुंबई

गिरगावमधील शेकडो वर्षांपूर्वीच्या अग्यारींना जर मेट्रोच्या कामामुळे धोका पोहोचणार असेल तर शिवसेनेचा त्याला जोरदार विरोध राहील. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तोडगा काढला जाईल, असे ठाम आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पारशी बांधवांना दिले.

गिरगावमधील वाडियाजी आतश बेहराम, अंजुमन आतश बेहराम, बनाजी आतश बेहराम, डॅडीशेट आतश बेहराम या चार अग्यारींना मेट्रोच्या कामामुळे धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात पारशी धर्मगुरू परवेश बजान यांच्यासह पारशी बांधवांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवन येथे भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, विकास हा नागरिकांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या सुविधांसाठी असतो. मात्र तो जर माणसांची, स्थळांची ओळख पुसणारा असेल तर असा विकास काय कामाचा? शेकडो वर्षांपूर्वीच्या पारशी अग्यारी या मुंबईचे वैभव आहेत. त्यांच्या तळाखालून मेट्रो गेल्याने जर या अग्यारींच्या पावित्र्याला धक्का पोहोचणार असेल तर शिवसेना तसे होऊ देणार नाही. शिवसेना पारशी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी शिवसेना उपनेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, ऍड. धर्मेंद्र मिश्रा, कृष्णा पोवळे, जमशेद सुखडवाला आदी उपस्थित होते.

अग्यारींच्या खालून मेट्रो
गिरगावमधील चार अग्यारींच्या खालून भुयारी मेट्रो जात आहे. अग्यारीमधील फायर टेंपलचा संबंध हा जमिनीशी येतो. या फायर टेंपलखाली कोणतेही भुयार नसावे असे संकेत आहेत. त्यामुळे याखालून मेट्रो गेल्यास याचे पावित्र्य धोक्यात येईल. या अग्यारींमध्ये पारशांव्यतिरिक्त कुणालाही प्रवेश नाही. त्यामुळे मेट्रोच्या अधिकाऱयांनाही अग्यारीत प्रवेश देऊ नये असे म्हणणे पारशी धर्मगुरू परवेश बजान यांनी मांडले.

आपली प्रतिक्रिया द्या