बरं झालं गद्दार गेले, त्यांच्यामुळे हिरे सापडले! उद्धव ठाकरेंचा मिंधे गटाला टोला, भाजपच्या अद्वय हिरेंचा शिवसेनेत प्रवेश

भाजपचे मालेगाव तालुक्यातील डॉ. अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेना भवन येथे बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंधे गटाला ‘बरं झालं गद्दार गेले त्याच्यामुळे हिरे सापडले’, सणसणीत टोला लगावला.

डॉ. अद्वय हिरे यांनी शिवबंधन बांधल्यानंतर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘बरं झालं गद्दार गेले त्याच्यामुळे हिरे सापडले. आजपर्यंत आम्ही खूप त्यांना पैलू पाडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही पैलू पडलेच नाही. मग त्यांनाच आम्ही हिरे म्हणून नाचवत राहिलो. पण ते दगड गेले, बुडाले आणि बुडणार आहेत’.

पुढे ते म्हणाले की, ‘एखाद्या पक्षावर विरोधीपक्षानं घाला घातला तर भाग वेगळा. पण एकेकाळचा मित्र पक्षच त्याचं कामकाज कसं चालतं हे अद्वय यांनी सांगितलं आहे. आम्ही 25-30 वर्ष भोगलेलं आहे. त्यांना सुद्धा आम्ही पालखीत बसवून मिरवणुका काढल्या पण पालखीत बसवून उदो उदो झाल्यानंतर त्यांना वाटायला लागलं की हे कायमचे आपले भोई आहेत. मी हे कायम सांगितलं शिवसेनाप्रमुखांनी जी शिवसेना स्थापन केली ती भाजपची पालखी वाहून नेण्यासाठी नाही. हिंदुत्त्वाची पालखी वाहण्यासाठी केली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठणकावलं.

आज त्यांचा जो किळसवाणा प्रकार सुरू आहे त्यामुळे तरुणांमध्ये संभ्रम आहे की राजकारण हे इतकं घाणेरडं आहे का? मी सांगतो की कोणतंही क्षेत्र घाणेरडं नसतं. त्या क्षेत्रातील चांगली किंवा वाईट माणसं त्याला चांगलं किंवा वाईट ठरवतात. त्याचप्रमाणे आता संपूर्ण देशात जो अत्यंत घाणेरडा किळसवाणा पायंडा भाजपने पाडलेला आहे तो आपल्याला गाडून टाकयचा आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हिरे कुटुंब आणि ठाकरे कुटुंबीय नव्याने आजपासून ऋणानुबंध सुरू होतो आहे असं नाही. संयुक्त महाराष्ट्रातही भाऊसाहेब यांचं योगदान साऱ्यांनाच माहित आहे. प्रशांतजींच्या प्रवेशावेळी मी मालेगावात आलो होतो, अशी आठवण देखील त्यांनी सांगितली. आता आमच्या पुढच्या पिढीची वाटचाल सुरू झाली आहे. त्यावेळी प्रशांतजी शिवसेनेसोबत आले होते मग मधल्या काळात ज्यांनी बिब्बा घातला त्यांना लांब ठेवावं लागेल, असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले.

अन्नाची शपथ घेणारेही तिकडे गेले!

गद्दार लोक हे स्वत:च्या स्वार्थासाठी जगताहेत त्यांना माणुसकी राहिलेली नाही. वापरा आणि फेका अशी वृ्त्ती आहे. त्या गद्दारांनी अन्नाची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी अशी गद्दारी करणार नाही. तरी ते गेले. आता अन्नाची शपथ खरी असते नसेत. शपथ खरी असते नसते हा त्याचा अनुभव आणि प्रश्न आहे. पण आता केवळ मालेगाव पुरता काम करून चालणार नाही उत्तर महाराष्ट्र बघावा लागेल आणि सोबतच महाराष्ट्रातही फिरावं लागेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मालेगावात सभा घेणार!

‘तुमचा उत्साह बघून महिन्याभरात मालेगावातच सभा घेऊ’, असं उद्धव ठाकरे यांनी म्हणताच शिवसेना भवनात टाळ्यांचा कडकडात झाला. तिथे मनमोकळेपणानं बोलता येईल. इथे छोटं छोटं बोलण्यापेक्षा तिथे मोकळ्यामैदानात बोलायचं, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

‘मविआ’ला कमीत कमी 40 जागा लोकसभा जागा मिळतील!

‘महाराष्ट्रातील जनता आता निवडणुकांची वाट बघते आहे. त्यांचे सर्वे चालू आहेत. त्यांच्या सर्वे नुसार आता लोकसभा निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला किमान 34 जागा मिळतील. मला वाटतं किमान हा शब्द त्यांनी घाबरून वापरला आहे. आपण एकत्र राहिलो, घट्ट राहिलो तर कमीत कमी 40 जागा आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही’, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर पुढे जाऊन ते म्हणाले की, ‘त्यांना (भाजप-मिंधे गट) थोड्या जागा सोडायला हरकत नाही. त्यासुद्धा जनतेने सोडल्या तर… नाही तर काय सांगावं? लोकशाही म्हटल्यावर जनता ही सार्वभौम असते. त्यांचा त्रिफळाच उडवायचा जनतेने ठरवलं तर 48 च्या 48 जागा सुद्धा मविआ जिंकू शकते आणि ती जिंकण्याची तयारी, हिंमत आणि जिद्द त्या जिद्दीने आपण पुढे जाऊ’.