पेटीएम केवायसी करतो सांगून खात्यातून 1लाख 15 हजार लांबवले

437

पेटीएम केवायसी म्हणून लिंक पाठवून परस्पर दोन बँकेच्या खात्यामधून ११५१९८ रुपये काढून घेऊन फसवणूक करण्यात आल्याची घटना उदगीर शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या ऑनलाईन फसवणूकी संदर्भात उदगीर शहर पोलीस ठाण्यात विकास विलासराव पत्तेवार यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादीचे उदगीर येथे मेडिकल दुकान आहे. ४ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता त्यांच्या मोबाईलवर फोन आला. पेटीएम ऑफीसवरुन बोलतोय, तुमची केवायसी संपलेली आहे असे सांगून त्याने विलास पत्तेवार यांना एक लिंक पाठवली. आयसीआयसीआय बँक शाखा उदगीर येथील त्यांच्या खात्यामधून ७५९९ आणि पुन्हा एकदा ७५९९ रुपये असे एकूण १५१९८ रुपये काढून घेण्यात आले परंतू फिर्यादीस त्याचा मेसेज प्राप्त झाला नाही त्यामुळे त्यांना त्याची माहिती मिळाली नाही. पुन्हा फिर्यादीने पेटीएम खाते चालू झाले नाही म्हणून त्यांना आलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून सांगीतले असता त्याने पुन्हा एकदा लिंक पाठवली. त्यानंतर फिर्यादीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमधून ५०००९ रुपये दोन वेळा काढण्यात आल्याचा मेसेज फिर्यादीच्या मोबाईलवर मिळाला. त्यानंतर त्यांनी तातडीने बँकेच्या शाखेत जाऊन माहिती घेतली असता त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. दोन्ही बँकेच्या खात्यामधून अज्ञात व्यक्तीने तब्बल ११५३९६ रुपये काढून घेऊन फसवणूक केली. उदगीर शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या