उजनी भरले; 20 हजार क्युसेकने विसर्ग, पंढरपूरसह काही गावांना धोका

गेल्या कर्षीच्या दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर उजनी धरण यंदा भरणार का, ही काळजी मिटली असून, उजनी तुडुंब भरू लागले आहे. धरणात येणाऱया पाण्याची आवक 1 लाख क्युसेकपर्यंत जाऊ लागल्याने सायंकाळी धरणातून 20 हजार क्युसेकने भीमा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे पंढरपूरसह काही गावांना धोका निर्माण झाला असून, पंढरपुरातील व्यास नारायण वसाहतीमधील 500 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

सोलापूर जिह्याची वरदायिनी असलेले उजनी धरणाने आज सकाळी 90 टक्क्यांची पातळी गाठली असताना करून धरणाकडे येणाऱया पाण्याची आवक 1 लाख क्युसेकपर्यंत पोहोचल्याने धरण प्रशासनाने धरणातून सुरुवातीला 20 हजार क्युसेकने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाण्याची पातळी वाढल्याने रात्री उशिरा 40 हजार क्युसेक गतीने पाणी नदीपात्रात सोडले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

एका बाजूला उजनी धरण ओक्हरफ्लो होत असताना सातारा जिह्यातील वीर धरणातूनही नीरा नदीत 42 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर जिह्याच्या सीमेवर असणाऱया नीरा नृसिंहपूर येथे भीमा आणि नीरा नदीचा संगम होऊन हे सर्व पाणी पंढरपूरकडे जाते. सध्या याच वीर धरणातून सोडलेल्या पाण्याने भीमा दुथडी भरून काहत असताना आता यात उजनी धरणाचे पाणी येण्यास सुरुकात झाल्यास पंढरपूरचा पुराचा धोका काढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनही अलर्ट मोडवर आहे.

उजनी धरण भरल्याने आता सोलापूर जिह्यासह नगर, धाराशीव आणि पुणे जिह्यातील अनेक भागांचा पिण्याच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सोमवारी धरण शंभरी ओलांडेल असे संकेत आहेत. उजनी धरण एकूण 117 टीएमसी क्षमतेचे असून, सध्या धरणात 111 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

पंढरपुरातील 500 लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

वीर आणि उजनी धरणातून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात केल्याने पंढरपूर शहरातील व्यास नारायण वसाहतीतील 500 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

दारणा धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडले

नाशिक, घोटी, इगतपुरी व धरण कार्यक्षेत्रात 24 तासांत 495 मिलीमीटर म्हणजेच 20 इंच असा दमदार पाऊस पडल्याने दारणा, गंगापूर धरण 86 टक्के भरली आहेत. दारणा धरणात 86.54 टक्के इतका पाणीसाठा झाला, तर भाम, भावली धरणे भरली आहेत. आज सकाळी दारणेतून गोदावरी नदीत 46 हजार क्युसेकने पाणी सोडले होते. हे पाणी रात्रीपर्यंत 60 हजार क्युसेक होण्याची चिन्हे आहेत. सर्वत्र पावसाची संततधार सुरू असल्याने गोदावरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यावर्षी पहिल्यांदाच गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली असल्याने अनेक नागरिकांनी गोदावरी नदीचे पूजन केले.

मुसळधार पावसाने मुळा धरणात मोठी आवक

नगर दक्षिण जिह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरण पाणलोट क्षेत्रात ढगफुटीसदृश पर्जन्यवृष्टी सुरू आहे. आज दुपारी धरण पाणलोट क्षेत्रातून मुळा धरणाकडे 41600 क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे मुळा नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला. मुळा धरण पाणलोट क्षेत्रात व कोतुळकडील मुळा नदीला महापूर आला आहे. पुढील 24 ते 36 तासांत मुळा धरणात झपाटय़ाने पाण्याची आवक होणार आहे. दुपारी मुळातील पाणीसाठा सुमारे 19 हजार दशलक्ष घनफूट झाला होता.

सांगलीत पाणीपातळीत चढ-उतार सुरूच

सांगली जिल्ह्यात आज पावसाने तुरळक, तर काही ठिकाणी दमदार हजेरी लावली. कोयना धरणातून कालपासून 52 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होईल, असा अंदाज होता. पण, काल रात्रीपासून पाणीपातळी 39 फुटावर स्थिर आहे. मात्र, सकाळपासून सांगलीत कृष्णा नदीची पुन्हा 40 फुटांच्या इशारा पातळीकडे वाटचाल सुरू होती. त्यामुळे शहरातील मगरमच्छ कॉलनीत पाणी घुसल्याने नागरिकांचे स्थलांतर केले आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी काल रात्रीपासून संथ गतीने वाढत आहे, तर आज दिवसभरात ती 39 फुटांवर स्थिर आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने चढउतार होत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सांगलीत इशारा पातळी 40 फूट, तर धोका पातळी 45 फुटांवर आहे. कृष्णा नदीने पुन्हा इशारा पातळी गाठल्याने कृष्णाकाठ धास्तावला आहे.

भंडारदरा पाणलोटात ढगफुटीसदृश पाऊस

भंडारदरा रिंगरोड पाणलोट क्षेत्रात ढगफुटीसदृश पाऊस झाला. 24 तासांत घाटघर परिसरात 19 इंच (475 मि.मी.) पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे भंडारदरा धरणातून 27 हजार 114 क्युसेकने प्रवरा पात्रात विसर्ग सोडण्यात आला. यासह कृष्णावंती नदीपात्रातील 4 हजार 47 व टिटवी जलाशयातून सुमारे 500 क्युसेक असा एकूण 31 हजार 600 क्युसेकने निळवंडे धरणात नवीन पाणी वाहून येत आहे. यामुळेच निळवंडे धरणाच्या पाणीसाठय़ात लक्षणीय वाढ होत असून, धरण सुरक्षिततेबाबत दक्षता म्हणून निळवंडे धरण 82.24 टक्के म्हणजेच 6849 दशलक्ष घनफूट भरलेले असतानाच निळवंडे धरणातून या पावसाळ्यात प्रथमच तब्बल 7 हजार 320 क्युसेकने प्रवरा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला. दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जलसंपदाचे भंडारदरा शाखा अभियंता अभिजीत देशमुख यांनी केले आहे.