उजनी धरण तुडुंब तरीही सोलापूरवर पाण्याचे संकट

सोलापूर शहरावरील पाण्याचे संकट जणू पाचवीलाच पुजले आहे. गेल्या दोन दशकांपासून अवेळी अनियमित व तब्बल सहा दिवसांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो आहे. महापालिका पाण्यासाठी पाण्याहून अधिक पैसा खर्च करत असली तरी पाणीप्रश्न काही सुटत नाही. 18 ऑगस्टपासून पुन्हा विद्युत टंचाईचे कारण देत पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्धिपत्रक काढत पाणीपुरवठय़ाच्या विस्कळीतपणाची कबुली दिली आहे. 18 ऑगस्टपासून शहरात कमी वेळ व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारे उजनी धरण पंधरा दिवसांपासून तुडुंब भरले आहे. भीमा नदी व कालव्याद्वारे पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर विसर्ग सुरू असताना सोलापूर शहरवासीयांना मात्र एकदिवसआड पुरेसा पाणी पुरवठा करण्याचे नियोजन अद्यापही महापालिका करू शकली नाही.

सोलापूर शहरात पाणीपुरवठय़ावरून सर्वच राजकीय पक्ष सतत कोल्हेकुई करत असतात. मात्र, ठोस उपाययोजना सुचविण्यासाठी, करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. ऐन पावसाळ्यात उजनी धरण 100 टक्के भरलेले असतानाही कधी जलवाहिनी फुटल्यामुळे, कधी विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे तर कधी दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून उजनी धरण तुडुंब भरलेले असताना सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी सोलापूरकर करत आहेत. मात्र, चार ते सहा दिवसाआड होणारा पाणीपुरवठाही विस्कळीत होत चालला आहे. 18 ऑगस्ट रोजी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा उशिरा, कमी वेळ व कमी दाबाने होणार आहे व शहरातील पाणीपुरवठा रोटेशनने पुढे जाणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने कळविले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेले सण व आगामी गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.