Hyderabad Encounter- पोलिसांची न्याय देण्यासाठीची प्रक्रिया योग्य नव्हती! उज्ज्वल निकम

3616

हैदराबादमध्ये झालेल्या एन्काऊंन्टर प्रकरणानंतर देशभरातील अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे. मात्र दुसरीकडे कायद्याच्या चौकटीतून या घटनेकडे बघत असताना जाणकारांनी या चकमकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या एन्काऊंन्टरमुळे देशातील सामान्य नागरीक नक्की खूश झाला आहे मात्र हैदराबाद पोलिसांनी न्याय देण्यासाठी जी प्रक्रिया वापरली ती योग्य नव्हती असं मत व्यक्त केलं आहे.

उज्ज्वल निकम यांची काही मराठी वृत्तवाहिन्यांनी फोनवरून प्रतिक्रिया जाणून घेतली. ही प्रतिक्रिया देत असताना ते म्हणाले की ‘कायद्याचा अभ्यासक म्हणून विचाराल तर हैदराबाद पोलिसांनी जे केलं ते कायद्याला धरून केलेलं नाही.’ आपण जर यापुढे झटपट न्यायामध्ये समाधान मानू लागलो तर कायद्याने प्रस्थापित राज्य ही संकल्पना नष्ट होईल असे निकम म्हणाले. अशा परिस्थितीत कायदा हातात घेऊन लोकांना संतुष्ट करणं हे जर पोलिसांनी ठरवलं तर काय गोंधळ होईल याची कल्पना आपण केली पाहिजे असे निकम यांनी म्हटले.

वृत्तवाहिन्यांना दिलेल्या प्रतिक्रियेत निकम म्हणाले की  ‘की बातम्यांमधून दिसून येत आहे की आरोपींनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यांच्या हातातील शस्त्र हिसकावून घेतली. आरोपींना तपासासाठी नेत असताना त्यांच्या हातात बेड्या घालणं गरजेचं असतं. जर त्यांच्या हातात बेड्या असत्या तर त्यांनी शस्त्र कशी हिसकावली? पोलीस इतके गाफील होते का ?’  हैदराबाद पोलिसांनी आतापर्यंत जे सांगितलंय त्यानुसार आरोपी पळत होते, पळताना त्यांनी दगडफेक केली. पोलिसांनी असंही म्हटलंय की आरोपींनी पोलिसांच्या हातातील शस्त्र काढून घेतली. हे तीनही प्रकार गृहीत धरले तरी पोलिसांनी केलेला गोळीबार योग्य नव्हता असं निकम यांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या