कुलभूषण जाधव भेटीमागे पाकिस्तानचे षडयंत्र – उज्ज्वल निकम

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

पाकिस्तान सरकारने कुलभूषण जाधव यांच्या आईला आणि पत्नीला भेट देण्याची परवानगी दिली आहे. मात्र ही भेट खाजगी न ठेवता ती प्रसार माध्यमांसमोर ठेवण्याचा पाकिस्तान सरकारचा कुटील डाव असण्याची शक्यता आहे. पाकिस्तान सरकार जर एकांतात भेट घडवून आणणार नसेल तर जाधव यांच्या आई व पत्नीने जाहीर भेटीवर बहिष्कार घालून पाकिस्तान सरकारचे पितळ उघडे पाडावे अशी स्पष्ट आणि परखड भूमिका विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडली आहे.

‘कुलभूषण जाधव यांच्या आई व पत्नीची भेट घडवून देणार असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले आहे. पाकिस्तान ही भेट या तिघांमध्ये एकांतात करून देतील असे वाटत नाही. जाधव कुटुंबाची भेट ही पाकिस्तानी आणि विदेशी प्रसार माध्यमांसमोर घडवून आणण्याचा पाकिस्तानचा कुटील डाव असू शकतो. या भेटी दरम्यान पाकिस्तान सरकार कुलभूषण जाधव यांच्यावर दडपण आणून त्यांचा छळ करून हेर असल्याची कबुली करून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे पाकिस्तान माणुसकीच्या गप्पा मारत असताना या भेटीचे भांडवल का करीत आहे या भेटी मागे त्यांचा लबाडीचा डाव असेल तर जाधव यांच्या आई व पत्नीने कुलभूषण यांची जाहीर भेट घेणे टाळून पाकिस्तनाचे पितळ उघडे पडावे असे मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.