उल्हासनगर: मण्णपूरम गोल्डवर दरोडा टाकणा-या तिघांना अटक

42

सामना ऑनलाईन । ठाणे

उल्हासनगर येथील ‘मणप्पूरम गोल्ड लोन’च्या कार्यालयावर दरोडा टाकून तब्बल २८ किलो सोने लंपास करणा-या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही जबरदस्त कारवाई करून २ किलो ८६२ ग्रॅम सोने जप्त केले आहे. त्याची किंमत ७७ लाख रुपये एवढी असून आणखी आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके विविध राज्यांमध्ये पाठविण्यात आली आहेत. अटक केलेल्यांपैकी एक आरोपी हा मूळचा झारखंड राज्यातील असून या दरोड्यामागे भले मोठे रॅकेट असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

उल्हासनगरमधील सुभाष टेकडी रोडवर मणप्पूरम गोल्ड लोनचे कार्यालय आहे. तेथून अनेक मध्यमवर्गीयांनी मेहनतीचे सोने तारण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज घेतले आहे. २४ व २६ डिसेंबर रोजी नाताळची सुट्टी असल्याने सदर कार्यालय बंद होते. त्याचा फायदा घेत दरोडेखोरांनी भिंतीला भगदाड पाडले आणि आत कार्यालयामध्ये घुसखोरी केली. एवढेच नव्हे तर गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडली व त्यातील ७ कोटी २२ लाख रुपये किमतीचे सोने घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

दरोडेखारांना पकडण्यासाठी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गुन्हे शाखेकडे तपास सोपविला. उल्हासनगरचे पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तपास करून तिघांना पकडले. वाशी, पनवेल, सुरत, पुणे, सांगोला, सोलापूर आदी विविध ठिकाणी तपास करण्यात आले. या दरोड्यातील एक आरोपी अख्तर समशेर शेख हा तुर्भे येथे येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यांनी तेथे सापळा लावून शेख याला अटक केली. तो झारखंडमधील समस्तीपूर येथे राहणारा आहे. त्याची कसून तपासणी केल्यानंतर कमरुद्दीन असुद्दीन शेख (तुर्भे) व मनोज साऊद (दिवा) यांना अटक केली.

२५ किलो सोने कोठे गेले…

दरोड्यातील आणखी २५ किलो सोने कुठे गेले याचा शोध सध्या सुरू असून तीन पोलीस उपनिरीक्षक व ५० पोलीस त्याचा संपूर्ण देशभर शोध घेत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. यावेळी सहपोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे आदी उपस्थित होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या