ओमी कलानींसह 8 नगरसेवक संपर्कक्षेत्राच्या बाहेर, भाजपचे टेन्शन वाढले

2037

उल्हासनगरमध्ये महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी TOK (टीम ओमी कलानी) पक्षाच्या 8 नगरसेवकांचा भाजपला थांगपत्ता लागेनासा झालाय. यामुळे भाजप नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे. भाजप नेत्यांचा गेले तीन दिवस या आठही नगरसेवकांशी संपर्क होत नाहीये.

उल्हासनगर महापालिकेवर भाजप, टीम ओमी कलानी आणि साई (Secular Alliance of India) या आघाडीची सत्ता आहे. या आघाडीकडे मिळून 44 जागा आहेत तर शिवसेनेकडे 21 जागा आहेत. उल्हासनगर महापालिकेमध्ये एकूण 78 जागा असून इथे सत्तास्थापनेसाठी किमान 40 नगरसेवकांचे संख्याबळ असणे गरजेचे आहे.

आपले नगरसेवक फुटतील या भीतीने भाजप आणि साई पक्षाने त्यांच्या नगरसेवक लोणावळ्याला पाठवले आहेत. भाजपला भीती आहे की त्यांचे 11 नगरसेवक फुटू शकतात. हे नगरसेवक टॉक पक्षाचे असून भाजपने आपल्याला फसवल्याची भावना या नगरसेवकांच्या मनात आहे. 2017 सालच्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने दिलेल्या आश्वासनांवर भरवसा ठेवत टॉक पक्षाच्या 21 नगरसेवकांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही. निवडणुकीनंतर भाजपने या निवडून आलेल्या नगरसेवकांना आमीष दाखवत ते आपलेच नगरसेवक असल्याचा दावा करायला सुरुवात केली. यामुळे ओमी कलानी आणि त्यांची साथीदार भडकले असल्याचं एका इंग्रजी वर्तमानपत्राने वृत्त दिलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या