पालिकेच्या ढिसाळ यंत्रणेमुळेच पाण्यावर तोडगा अशक्य

20

आयुक्तांच्या परखड विधानामुळे महासभेत गोंधळ
उल्हासनगर– २७ कोटींची पाणीपुरवठा योजना ३०० कोटी रुपयांच्या घरात गेली तरीही पाण्याची कनेक्शन्स नागरिकापर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यासाठी पालिकेची ढिसाळ यंत्रणा कारणीभूत आहे. अशा स्थितीत जरी मला दैवी शक्ती मिळाली तरीदेखील उल्हासनगरातील पाण्याच्या समस्येवर तोडगा काढणे अशक्यच आहे, असे परखड विधान महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी आजच्या महासभेत केले. या योजनेत सावळागोंधळ झाल्यानेच नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले असून ते कुणामुळे, त्यात कोण सहभागी याची एमजेपी (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण)च्या वतीने चौकशी करावी, अशी शिफारस राज्य शासनाकडे केल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले. यामुळे महासभेत सन्नाटा पसरला.

गेली अनेक वर्षे उल्हासनगर शहरात पाणीटंचाईने नागरिक त्रस्त आहेत. याबाबत जवळजवळ सर्वच पक्षांनी आंदोलने केली, परंतु पाणीटंचाईचा प्रश्‍न सुटू शकला नाही. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानंतरदेखील शहरात पाणी -समस्येचा, टंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत मनपा प्रशासनावर नाकर्तेपणाचा आरोप केला. पाणीसमस्या दूर झाली नाही तर मोठ्या प्रमाणात जनप्रक्षोभ होणार. नागरिक याबाबत संतप्त झाले असून ते नगरसेवकांना लक्ष्य करीत आहेत. आमच्यावर आता मार खाण्याची वेळ आली आहे असे ‘साई’ पक्षाच्या नगरसेविका शैलजा सोनताटे यांनी सांगितले. शिवसेना नगरसेवक धनंजय बोडारे म्हणाले की आमच्या पक्षांच्या नगरसेवकांनी पाणी प्रश्‍नावरून अनेक आंदोलने केली आहेत, नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. जर परिस्थिती अशीच राहिली तर शहराची स्थिती आणखी बिघडू शकते. पाणीपुरवठा अभियंता कलई सेल्वन यांच्यावर गैरजबाबदारीचे अनेक आरोप करण्यात आले. या आरोपांचे उत्तर देताना सेल्वन यांची चांगलीच भंबेरी उडाली.

याबाबत आयुक्त राजेंद्र निंबाळकर म्हणाले की, पाणी समस्येचे मूळ हे पाणीपुरवठा योजनेत आहे. ३०० करोड रुपये खर्च करूनदेखील जर तुम्ही शहराला पाणी देऊ शकले नाही यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट नाही! महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून ४० करोड रुपये अतिरिक्त या योजनेसाठी खर्च झाले आहेत. अजूनदेखील २५ टक्के भागात पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्या पोहोचल्या नाहीत. नवीन जलवाहिन्या टाकल्यानंतरदेखील जुन्या जलवाहिन्या अजूनदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. याबाबत कोणी विचार केला आहे का, असा टोमणा त्यांनी लोकप्रतिनिधींना मारला. यावर काही नगरसेवकांनी आक्षेप घेत आम्ही ठेकेदाराला जाब विचारला, लेखी तक्रारी दिल्या असे उत्तर दिले. पाणी समस्येबाबत उद्या ४ तारखेला शहरातील सर्वसामान्य नागरिक लोकप्रतिनिधी व इतर लोकांसोबत प्रत्यक्ष चर्चा करणार आहेत असे निंबाळकर यांनी महासभेत सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या