उल्हासनगरवासीयांचा करवसुलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

40

सामना प्रतिनिधी । उल्हासनगर

थकलेला मालमत्ता कर वसूल करताना मेटाकुटीस आलेल्या उल्हासनगर पालिका अधिकाऱयांनी अखेर अनोखी शक्कल लढवली आहे. नोव्हेंबर महिना अखेरपर्यंत जे करदाते आपला थकीत कर भरतील त्यांना कराच्या व्याजात भरघोस सूट देण्यात येणार आहे. या योजनेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून १ नोव्हेंबरपासून दररोज पालिकेच्या तिजोरीत एक कोटींचा कर जमा होत आहे.

उल्हासनगरकराकडे ३०४ कोटींच्या घरात मालमत्ता कराची थकबाकी आहे. ही रक्कम थकबाकीदारांनी भरल्यास विकासकामांना गती मिळणार आहे. आजपर्यंत बिल वेळेवर मिळत नाही अशा तक्रारी होत्या. त्यानुसार बचत गटाच्या महिलांवर प्रथम बिल वाटप करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. बिल वाटप झाल्यानंतर २०० महिलांना बिल भरण्याचे आवाहन करण्यासाठी घरोघरी पाठवण्यात आले. त्यामुळे कर भरण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाली.

पालिकेची अभय योजना

१ ते १५ नोव्हेंबरपर्यंत थकबाकी एकत्रित भरल्यास व्याजावर ७५ टक्के सूट, १६ ते ३० नोव्हेंबर ५० टक्के सूट, आणि १ ते ३१ डिसेंबर २५ टक्के सूट देण्याची घोषणा करण्यात आली. या योजनेस नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवडय़ात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिसू लागला आहे. थेट ७५ टक्के सूट असल्याने नागरिकांची गर्दी मालमत्ता कर भरण्यास होत आहे.

……….

‘मागील चार अभय योजनेपेक्षा ही पाचवी आणि अंतिम अभय योजना कमालीची यशस्वी होत आहे. उपायुक्त दादा पाटील, करनिर्धार व संकलक संतोष जाधव, उपकर निर्धारक जेठा ताराचंद, मनोज गोकलानी आदी फळी त्यासाठी सक्रिय झाली आहे. त्यामुळे विक्रमी वसुली डोळ्यांसमोर दिसत आहे. – राजेंद्र निंबाळकर, आयुक्त, उल्हासनगर पालिका.

आपली प्रतिक्रिया द्या