उमेश कोल्हे हत्या प्रकरण, आरोपी शमीम अहमदची माहिती देणाऱ्याला NIA ने जाहीर केले बक्षिस

अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील शमीम अहमद उर्फ फिरोझ अहमद हा फरार आहे. त्याची माहिती देणाऱ्याला NIA ने बक्षिस जाहीर केलं आहे. शमीमची माहिती देणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचं राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने जाहीर केलं आहे.

उमेश कोल्हे यांची अमरावतीमध्ये 21 जून रोजी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमोल कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेखला अटक करण्यात आली आहे. शमीम अहमद उर्फ फिरोझ अहमद नावाचा आरोपी मात्र अजूनही फरार असून त्याची माहिती देणाऱ्याला NIA बक्षिस जाहीर केले आहे.

उमेश कोल्हे हे 21 जूनच्या रात्री त्यांचे मेडिकल स्टोअर बंद करून घरी जात असताना त्यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. हत्या झाली तेव्हा कोल्हे यांचा मुलगा संकेत त्याची पत्नी वैष्णवीसोबत दुसऱ्या बाईकवरून त्यांच्या मागून येत होता.