मतभेद विसरून कोरोनाशी लढण्यासाठी एकत्र या; संयुक्त राष्ट्रांचे आवाहन

577

कोरोनाचा प्रकोप जगभरात वाढत आहे. त्यामुळे सर्व देशांनी परस्परातील मतभेद विसरून कोरोनाविरोधात लढण्यासाठी एकत्र, यावे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांनी जगातील सर्व देशांना केले आहे. कोरोनाचा वाढता फैलाव हे जागतिक संकट असून त्याविरोधात एकत्र येऊन लढण्याची गरज आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अंतानिओ गुतारेस यांनी सांगितले.

सर्व देशांनी तत्काळ संघर्षविराम जारी करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोनाच्या जागतिक संकटाविरोधात आता एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळे परस्परातील भांडणे, तंटे, वाद, मतभेद, संघर्ष बाजूला सारून कोरोनाविरोधात लढण्यासाठी एकत्र या, असे आवाहन त्यांनी केले आहे. ही वेळ परस्परातील युद्धाची नसून कोरोनाविरोधातील युद्धाची आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील उपाययोजनांवर प्रत्येक देशाने लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहनही गुतारेस यांनी केले आहे.

कोरोनाचा उद्रेक इटली, इराण आणि अमेरिकेत वाढला आहे. कोरोनामुळे जगभरात 15 हजार जणांचा मृत्यू झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी याची गंभीर दखल घेत, जगातील सर्व देशांनी परस्परातील मतभेद दूर करत कोरोनाविरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. चीनमधून जगभरात आतापर्यंत 174 देशात कोरोना पसरला आहे. तर सुमारे 4 लाख लोकांना याचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे या रोगाचा पसरण्याचा वेग प्रंचड आहे. संपूर्ण जग एका समान शत्रूचा मुकाबला करत आहे. हा शत्रू देश, नागरिकत्व, जात, धर्म, पंथ, वर्ण कसलाच मतभेद करत नाही. सर्व नागरिकांवर तो हल्ला चढवत आहे. अशा समान शत्रूविराधात लढण्याऐवजी युद्ध करणे मूर्खपणाचे ठरेल, त्यामुळे सर्व देशांना आपण तातडीने संघर्षविराम जारी करण्याचे आवाहन करत असल्याचे गुतारेस यांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या