16 वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा- अर्णव पापरकर, साई जान्वी टी यांना विजेतेपद, नानिका बेंद्रम, सेजल भुतडा दुहेरीत विजेत्या

मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अर्णव पापरकर व मुलींच्या गटात कर्नाटकच्या साई जान्वी टी. यांनी अंतिम लढतीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत 18व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स येथे ही स्पर्धा सुरू आहे. विजेतेपदाच्या लढतीत पात्रता फेरीतून आलेल्या महाराष्ट्राच्या बिगर मानांकित अर्णव पापरकरने 2 तास चाललेल्या सामन्यात आपल्या राज्य सहकारी चौथ्या मानांकित समर्थ सहिताला 2-6, 6-3, 6-2 असा पराभवाचा धक्का देत विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात कर्नाटकच्या बिगर मानांकित साई जान्वी टी. हिने तेलंगणाच्या नवव्या मानांकित ऋषिता बसिरेड्डीचा 7-5, 6-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

दुहेरीत विजेतेपदाच्या लढतीत मुलांच्या गटात दिल्लीच्या प्रणील शर्मा व हरयाणाच्या आदित्य मोर या जोडीने कर्नाटकच्या आराध्या क्षितिज व श्रीनिकेत कन्नन यांचा 6-3, 6-4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या नैनिका बेंद्रम व सेजल भुतडा या दुसऱया मानांकित जोडीने आपल्या राज्य सहकारी आकृती सोनकुसरे व  ऐश्वर्या जाधव या अव्वल मानांकित जोडीला 6-3, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभवाचा धक्का देत विजेतेपदाला गवसणी घातली.

स्पर्धेतील एकेरी व दुहेरीच्या विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डी. वाय. पाटील इन्स्टिटय़ूटचे संजय पाटील, एमएसएलटीएचे आजीव अध्यक्ष शरद कन्नमवार, एआयटीएचे सहसचिव व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, एमएसएलटीएचे सहसचिव शीतल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री व स्पर्धा सुपरवायझर वैशाली शेकटकर, स्पर्धा चेअरमन दिलीप मोहिते, केडीएलटीएचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश कित्तुर, केडीएलटीएचे सदस्य मुरलीधर घाटगे, केडीएलटीएचे मानद सचिव मेघन बागवडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच याप्रसंगी स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू अर्णव पापरकर व प्रिशा शिंदे यांना छत्रपती शाहू महाराज करंडक प्रदान करून गौरविण्यात आले.