14 वर्षीय खेळाडू टीम इंडियाला भारी, 23 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला

1669

आंतरराष्ट्रीय स्तरावर अफगाणिस्तानच्या सिनियर संघाने कसोटी विजयाचा विक्रम प्रस्थापित केल्यानंतर ज्यूनियर संघाने आपली छाप सोडली आहे. श्रीलंकेत सुरू असणाऱ्या अंडर-19 आशिया चषकामध्ये अफगाणिस्तानच्या ज्यूनियर संघाने दमदार कामगिरी केली. हिंदुस्थानविरुद्ध अफगाणिस्तानला पराभव स्वीकारावा लागला असला तरी संघातील 14 वर्षीय खेळाडू टीम इंडियाला भारी पडला आहे. या खेळाडूने 23 वर्षापूर्वीचा पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिकचा विक्रम मोडला आहे.

कोलंबोत झालेल्या अंडर-19 लढतीत अफगाणिस्तानच्या 14 वर्षीय चायनामन गोलंदाज नूर अहमदने टीम इंडियाविरुद्ध बळींचा चौकार लगावला. नूरने त्याच्या गोलंदाजीवर हिंदुस्थानचा कर्णधार ध्रुव जुरेल, सलिल अरोरा, तिलक वर्मा आणि अथर्व अंकोलेकर यांना बाद केले.

नूर यूथ वन डेमध्ये चार विकेट घेणाऱ्या सर्वात कमी वयाचा गोलंदाज ठरला आहे. नूरचे वय 14 वर्ष 249 दिवस आहे. त्याने शोएब मलिकचा विक्रम मोडला आहे. शोएबने 1996 मध्ये 15 वर्षांचा असताना इंग्लंडविरुद्ध 38 धावात 4 विकेट घेतल्या होत्या.

साजिदा शाह पुढे
अंडर-19 मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात पुरुष आणि महिला दोन्हीमध्ये फक्त एकच खेळाडू नूर अहमदच्या पुढे आहे. पाकिस्तानच्या साजिदा शाहने 2001 मध्ये 13 वर्ष 68 दिवस वय असताना नेदरलँडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 22 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या.

टीम इंडियाचा विजय
या लढतीत प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने अफगाणिस्तानच्या संघाला 124 धावांवर बाद केले. सुशांत मिश्राने 20 धावांत 5 गडी बाद केले. तर अंकोलकरने 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना हिंदुस्थानची दमछाक झाली. फक्त 3 फलंदाजांनाच 15 पेक्षा जास्त धावा करता आल्या. यात अर्जुन आझाद 21 धावा तर अरोरा आणि शाश्वत रावत यांनी प्रत्येकी 29 धावा काढल्या.

आपली प्रतिक्रिया द्या