छोटा पॅकेट बडा धमाका, ‘अंडर-१९’ स्टार झाले कोट्यधीश

41

सामना ऑनलाईन । बेंगळुरू

अंडर-१९ विश्वचषकामध्ये ३० तारखेला हिंदुस्थान आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघामध्ये सेमिफायनलचा सामना रंगणार आहे. या सामन्याआधी अंडर-१९ खेळाडूंना बेंगळुरूमध्ये सुरू असलेल्या आयपीएल लिलावात कोट्यवधींची बोली लागली आहे. यामध्ये अंडर-१९ संघाचा कर्णधार मुंबईकर पृथ्वी शॉ, शुभम गिली आणि कमलेश नागरकोटी या खेळाडूंचा समावेश आहे. चला तर पाहूया कोण आहेत हे खेळाडू…

पृथ्वी शॉ –
अंडर-१९ क्रिकेट संघाचा कर्णधार आणि रणजी ट्रॉफीमध्ये धमाकेदार शतक झळकावणाऱ्या पृथ्वी शॉला आयपीएलच्या लिलावात चांगली किंमत मिळाली आहे. १८ वर्षीय पृथ्वीला आयपीएल लिलावामध्ये २० लाख रुपयांची बेस प्राईज होती. त्याला दिल्ली संघाने १ कोटी २० लाख रुपयांना खरेदी केले. अंडर-१९ विश्वचषकामध्ये पृथ्वीने शानदार खेळीने क्रीडाप्रेमींना भुरळ घातली आहे. पृथ्वीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९४ आणि पापुआ न्यू गिनिया संघाविरुद्द ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. पृथीने प्रथम श्रेणीच्या ९ सामन्यात ५६.५२च्या सरासरीने ९६१ धावा कुटल्या आहेत.

कमलेश नागरकोटी –
अंडर-१९ विश्वचषकामध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने भक्कम फलंदाजीचे कंबरडे मोडणाऱ्या नागरकोटीला आयपीएलच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ३ कोटी २० लाखांची भरभक्कम रक्कम देऊन खरेदी केले आहे. नागरकोटीने अंडर-१९ मधील एकदिवसीय सामन्यात १४० ते १४५ प्रतीतास वेगाने गोलंदाजी करत अनेकांना आश्चर्यचकीत केले होते.

शुभम गिल –
पृथ्वी शॉच्या खांद्याला खांदा लावून अंडर-१९मध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या शुभम गिलला कोलकाता नाईट रायडर्सने १ कोटी ८० लाख रुपयांची बोली लावत खरेदी केले. गिलची बेस प्राईज २० लाख रुपये होती. लिलावामध्ये राजस्थान, पंजाब आणि कोकतामध्ये चढाओढ सुरू होती. गिलने मागील वर्षी इंग्लंडच्या संघाविरुद्ध शानदार १४७ धावांची खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पंजाबकडून प्रथम श्रेणींचे सामने खेळणाऱ्या गिलीने शानदार फलंदाजी केली आहे.

IPL लिलाव २०१८ – वेगाच्या ‘या’ बादशाहांना खरेदीदार नाही

रणजीमधील खेळाडूंकडे दुर्लक्ष
आयपीएलच्या आजच्या लिलावामध्ये हिंदुस्थानकडून न खेळलेल्या आणि प्रथम श्रेणीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी मोठी बोली लागली असली तरी रणजी ट्रॉफी गाजवणाऱ्या खेळाडूंकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. रणजीमधील सर्वाधिक धावांचा विक्रम करणाऱ्या मयांग अग्रवालला किंग्स इलेव्हन पंजाबने फक्त १ कोटी रुपयांना खरेदी केले. दुसरीकडे विदर्भाला पहिल्यांदा रणजी चॅम्पियन करण्यात महत्त्वाची भुमीका निभावणाऱ्या रजनीश गुरबानी या गोलंदाजाला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या