पृथ्वीसेना विश्वविजयी, ऑस्ट्रेलियाचा धुव्वा; हिंदुस्थानला चौथ्यांदा जगज्जेतेपद

11

सामना ऑनलाईन । माऊंट मॉनगनुई

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली व पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने शनिवारी ऑस्ट्रेलियाचा ८ गडी व ७६ चेंडू राखून धुव्वा उडवत चौथ्यांदा विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली. मनजोत कालराने १०१ धावांचा शतकी धमाका करीत युवा टीम इंडियाच्या जगज्जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पृथ्वी सेनाने एकही लढत न गमावता हा वर्ल्ड कप जिंकला. मनजोत कालराच्या धडाकेबाज १०१ धावांमुळे त्याचीच सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. शुभमन गिलने प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ३७२ धावांचा पाऊस पाडत मालिकावीराचा मान संपादन केला. हिंदुस्थानच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर चोहोबाजूंनी कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत असून जागोजागी सेलिब्रेशनही करण्यात येत आहे.

ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या २१७ धावांचा पाठलाग करणाऱया टीम इंडियाने अवघे २ गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. मनजोत कालरा व कर्णधार पृथ्वी शॉ यांनी ७१ धावांची दमदार सलामी दिली. पण विल सदरलॅण्डच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉ २९ धावांवर बाद झाला आणि जोडी तुटली. त्यानंतर आलेल्या शुभमन गिललाही मोठी खेळी करता आली नाही. अर्थात त्याने महत्त्वपूर्ण असे ३१ धावांचे योगदान दिले. मनजोत कालरा व हार्विक देसाई यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ८९ धावांची भागीदारी रचत हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मनजोत कालराने ३ षटकार व ८ चौकारांनिशी नाबाद १०१ धावांची मौल्यवान खेळी साकारली. हार्विक देसाईने नाबाद ४७ धावा केल्या.

पृथ्वीच्या शिरपेचात मानाचा तुरा
मुंबईकर पृथ्वी शॉच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. हिंदुस्थानच्या युवा संघाने मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली २००० साली, विराट कोहलीच्या नेतृत्वात २००८ साली, उन्मुक्त चंदच्या नेतृत्वात २०१२ साली वर्ल्ड कप जिंकण्याची करामत करून दाखवली होती. आता हिंदुस्थानला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा पृथ्वी शॉ चौथा कर्णधार ठरला.

बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव
बीसीसीआयकडून विश्वविजेत्या हिंदुस्थानी संघाला गौरविण्यात येणार असून यावेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याला ५० लाख, संघातील प्रत्येक खेळाडूला ३० लाख व सपोर्ट स्टाफ यांना २० लाख रुपये बक्षिसाच्या रूपात देण्यात येणार आहेत.

विश्वचषकाचे तीन हीरो

मुंबईकर पृथ्वी शॉ
२६१ धावा
कर्णधार पृथ्वी शॉने सहा सामन्यांमधून दोन अर्धशतकांच्या सहाय्याने ६२ .२५ च्या सरासरीने २६१ धावा फटकावल्या.

अनुकूल रॉय
१४ बळी
६ सामन्यांमध्ये ९.०७ अॅव्हरेज, ३.८४ चा रेट

शुभमन गिल
३७२धावा
एक शतक व तीन अर्धशतके

आपली प्रतिक्रिया द्या