हिंदुस्थानचा ‘अंडर-१९’मधील ब्रॅडमन आणि लाल रूमाल

21

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘अंडर-१९’ विश्वचषकामध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर फायनल जिंकून देणाऱ्या शुभम गिलला हिंदुस्थानचा ‘ब्रॅडमन’ असे म्हटले जात आहे. फायनलमध्ये गिलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत वेगवान ३१ धावांची खेळी केली. हिंदुस्थानकडून खेळताना गिलने मागील १५ डावात १०४.४६च्या अविश्वसणीय सरासरीने ११४९ धावा ठोकल्या आहेत. यात त्याच्या ४ शतकांचा आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. गिलने अंडर-१९ विश्वचषकात ६ सामन्यातील ५ डावांमध्ये फलंदाजी करताना ३७२ धावा केल्या आहेत. यापैकी चार सामन्यात त्याने ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

उपांत्यफेरीत पाकिस्तानविरुद्ध गिलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत १०२ धावांची दमदार खेळी केली होती. गिलच्या या शतकी खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करताना २७२ धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानला ६९ धावांमध्ये गुंडाळत हिंदुस्थानने २०३ धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला होता.

गिलची खेळण्यातील लकब आणि फलंदाजी विराट कोहलीसोबत मिळतीजुळती असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. तसेच गिलही विराट कोहलीचा मोठा चाहता आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने सचिन तेंडुलकर ऑल टाईम फेवरेट असला तरी आता मला विराट कोहली जास्त आवडतो असे सांगितले होते. कोहलीची खेळण्याची स्टाईल, मैदानावर दबावात फलंदाजी करण्याचे तंत्र भावल्याचे गिल म्हणाला. तसेच कोहलीप्रमाणे मैदानावर कामगिरी करण्यासाठी उत्सूक असल्याचेही तो म्हणाला.

आयपीएलच्या लिलावामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने गिलला १ कोटी ८० लाखांना खरेदी केले. मैदानावरील धावांची भूक आणि आक्रमकता यामुळे गिलला येत्या काळातील विराट कोहली बोलले जात आहे.

लाल रूमालचे रहस्य
पाकिस्तानविरुद्ध उपांत्यफेरीत फलंदाजीला आलेल्या शुभम गिलच्या कंबरेला लाल रंगाचा रूमाल दिसून आला होता. याबाबत बोलताना गिल म्हणाला की, ‘मी आधीपासून कंबरेला लाल रूमाल लावून फलंदाजी करतो. याआधी मी पांढऱ्या रंगाला रूमाल लावून मैदानात उतरत होतो, मात्र एका सामन्यात लाल रंगाचा रूमाल लावून मैदानात उतरलो आणि त्या सामन्यात मी शतक झळकावले. तेव्हापासून मी लाल रंगाचा रूमाल वापरू लागलो.’

आपली प्रतिक्रिया द्या