
बिहारमधील भागलपूरमध्ये गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला. पूल कोसळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, खगरिया-अगुवानी-सुलतानगंज दरम्यान गंगा नदीवर हा पूल बांधण्यात येत होता. 4 वर्षांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याची पायाभरणी केली होती. तेव्हापासून या पुलाचे बांधकाम सुरू होते. मात्र रविवारी हा निर्माणाधीन पूल कोसळला. अवघ्या काही सेकंदामध्ये हा पूल गंगेत कोसळला. धक्कादायक म्हणजे दोन वर्षांपूर्वीही या पुलाचा काही भाग कोसळला होता.
गंगा नदीवर असलेला हा पूल 1717 कोटी रुपये खर्च करून बांधला जात होता. वादळामुळे या पुलाच्या काही भागाचे एप्रिल महिन्यातही नुकसान झाले होते.
View this post on Instagram
दोषींवर कठोर कारवाई होईल
दरम्यान, ही घटना दुर्दैवी आहे. यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या पुलाचे उद्घाटन होईल, अशी आमची अपेक्षा होती. मात्र वारंवार असे अपघात घडत असून हा तपासाचा विषय आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. त्याची चौकशी होईपर्यंत काहीही सांगणे कठीण असल्याचे जेडीयूचे आमदार ललित मंडल म्हणाले.
विरोधकांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दरम्यान, निर्माणाधीन पूल कोसळल्याने विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. 2014मध्ये 600-700 कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या पुलाची किंमत 1700 कोटींपर्यंत पोहोचली आहे. बिहार सरकार कमिशन खात असून उच्च अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पैसा वसूल केला जात आहे. याची न्यायालयीन चौकशी व्हावी. बिहारची जनती नितीश कुमार सरकारला माफ करणार नाही, असे ते म्हणाले.