मध्य प्रदेशमध्ये ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या नावाखाली गरिबांची लूट

21

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्य प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या नावाखाली काही भामटे गोरगरिबांना लुटत असल्याचे समोर आले आहे. हे भामटे गरीब व गरजूंना कर्ज देण्याचे आमिष दाखवून प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली हजारो रुपये उकळत आहेत. यासाठी भामट्यांनी एजंटही नेमल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने याबद्दल वृत्त दिले आहे.

छोट्या व्यावसायिक व गरजूंना तातडीने पन्नास हजारापासून दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ सुरु केली आहे. पण मध्य प्रदेशमध्ये या योजनेच्या नावाचा गैरवापर होत आहे. या योजनेच्या अंतर्गत तुम्हांला तीन लाख रुपयांपर्यतचे कर्ज मिळेल. पण त्यासाठी १२० रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल असे सांगून काहीजणांनी गरजवंतांना चुना लावण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’चे होर्डिंग्जही या भामट्यांनी गावोगावी लावले आहेत. यामुळे सरकारच आपल्याला कर्ज देत असल्याचे समजून अनेकजण या भामट्यांच्या जाळ्यात सहज अडकत आहेत. त्यातही निरक्षर व्यक्ती ज्यांना कर्ज देण्यास बँकांनी अपात्र ठरविले आहे त्यांना भामटे हेरत आहेत. यासाठी गावातील बेरोजगार तरुणांना हाताशी धरून गावकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी दबाव टाकत आहेत. यासाठी या तरुणांना महिन्याला दहा हजार रुपये पगारही दिला जात आहे. विशेष म्हणजे यातील बऱ्याचजणांना हे सरकारी कामच असल्याचे वाटत असल्याने ते सरकारी नोकरी मिळाल्याचा आनंद व्यक्त करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या