निसर्गभान- निसर्गाचे मूळ तत्त्व

2972

विकासाच्या नावाखाली पर्यावरणामध्ये मानवी हस्तक्षेप वाढल्याने हवामान बदल, जागतिक तापमान वाढ अशा मोठय़ा समस्यांनी डोके वर काढले आहे. यात जैवविविधतेचा ऱ्हास हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वसुंधरेच्या  हिरवाईची आणि त्यावरील परीसंस्थेची जाण व्हावी याकरताच जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत जागरुकता निर्माण करत जगभरात २२ मे हा दिवस जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिक दिवस म्हणून जगभर सर्वच देश जैवविविधता म्हणून हा दिवस २०१३ पासून साजरा करीत आहेत मात्र स्थानिक पातळीवर अजूनही याची जागरूकता नसल्याचे पाहावयास मिळते. या वर्षी तर हिंदुस्थानात महाभयंकर दुष्काळ असल्याने या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे दिसून येते. कारण दुष्काळी परिस्थितीत अनेक जीव पाणी व अन्नाविना कायमचे नष्ट होतात. त्यामुळे आपण वन्यजीव वाचविणे गरजेचे आहे यासाठी आपण सर्वांनी आपल्या परिसरातील वनस्पती व वन्यजीव वाचविणे खूप गरजेचे आहे. जगातील सर्व प्रजाती व अधिवास यांचे जाळे म्हणजेच जैवविविधता असते. निसर्गातील जैवविविधता मानवी जीवनाला अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची ठरलेली आहे. त्यामुळे जैविविधतेचे जतन करणे क्रमप्राप्त आहे. आपण जैविविधतेमुळे जिवंत आहे हे विसरून चालणार नाही अन्यथा आपल्या विनाश अटळ आहे. विशेष म्हणजे आपला सर्व विकास हा जैवविविधतेवर अवलंबून असतो आणि ज्या देशाची विविधता जास्त तेवढा देश श्रीमंत असे नामांकन आहे. आजच्या जगतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

या भूमीवर असलेले असंख्य जीव व गुंतागुंतीचे जीवन चक्र माणसाला अजूनही न समजलेले गूढ रहस्य आहे. आपण मुंगीएवढे पण चांगले व शाश्वत काम या भूमीवर करू शकलो नाही. कारण मुंगीचे संख्यात्मक विचार केल्यास सर्वात जास्त प्रमाण आहे, मात्र कसलेच प्रदूषण नाही मात्र माणूस या जीवाचा आदर्श घेण्यात कमी पडतायेत हे या दुष्काळावरून दिसून येतेय. आज दुष्काळातही मुग्यांनी जगण्यासाठी लागणारी सर्व तयारी आपल्या छोटय़ाशा वारुळात केल्याचे दिसून येते, मात्र माणसाने स्वतःला संपवणे सुरू केल्याचे दिसून येतेय. जगण्याची वृत्ती व शाश्वत विकास हा मुंगीने मानवाला दिलेला खरा मंत्र समजावून घेतला पाहिजे. यासाठी आपल्या जैवविविधतेचा होणारा ऱहास तातडीने थांबवला पाहिजे. यासाठी आपल्या गरजेप्रमाणे नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर केल्यासच आपण आपल्या परिसरातील जैवविविधता वाचवू शकतो.

जैवविविधतेला मुख्य प्रवाहात आणणे, लोकांचे जीवनमान व उपजिवीकेची साधने शाश्वत करण्यासाठी या वर्षीची संकल्पना आहे. यात अगदी स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. पूर्वी जागतिक विचार व स्थानिक कृतिशीलता असा नारा होता, मात्र अलीकडे स्थानिक विचार व स्थानिक कृती करावी लागेल असे चित्र पाहावयास मिळते.

या दिनानिमिताने लोकांमध्ये भूमातेवर असलेली प्राणी व वनस्पती यांची जैविक विविधता वाचविण्यासाठी प्रत्येक माणसामध्ये आत्मीयता निर्माण करणे काळाची गरज आहे. अन्यथा मानवाचा शेवट असेल यात शंका नाही. आपल्या परिसरातील असलेले जीवाचे जाळे खूपच गुंतागुंतीचे असते. यात स्थानिक जीव हा वैश्विक कामगिरी करत असतो हे समजावून घेणे गरजेचे आहे. तपमान वाढ काही जीवांचे प्रमाण वाढवते तर काही जैव कायमचे नष्ट करते. त्यामुळे आपण खूपच काळजीपूर्वक जतन करणे आवश्यक आहे. संवर्धन करताना उत्पादक असणाऱया सर्वच हिरव्या वनस्पती यांचे जतन करणे व लागवड करणे गरजेचे असताना आपण मात्र परदेशी झाडे जास्त प्रमाणात लावल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळते आहे. आपण स्थानिक वन्यजीव वाचविण्यासाठी स्थानिक वनस्पती वाचविल्या पाहिजेत हे आपण विसरूनच गेलोय. यापुढे आपण आपल्या परिसरातील स्थानिक जातीची झाडे व गवताचे संरक्षण केलेच पाहिजे अन्यथा आपल्या परिसरातील एक एक जीव हळूहळू नष्ट झाल्यशिवाय राहणार नाही. अगदी परिसरातील साधीभाबुळ कमी झाली तरी त्याचा परिणाम सुगरण पक्षी कमी होणे तसेच चिंकारा जातीची हरणे कमी होणे इतपर्यंत होत असतो.

जगातील जैवविविधता ही स्थानिक जंगल नैसर्गिक अवस्थेत असेल तरच मोठय़ा प्रमाणात पाहावयास मिळते हे विसरून चालणार नाही.

जैवविविधता याविषयी आवड निर्माण करण्यासाठी लोकांना स्थानिक पातळीवर नैसर्गिक सहली तसेच वन्यजीव व त्यांचे शेतीला असणारे योगदान याविषयी जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे असे वाटते. स्थानिक वृक्षारोपण, शाश्वत शेती तसेच पाणी व माती व्यवस्थापन करण्यासाठी जागरूकता निर्माण करावी लागेल. या टप्प्यात शाळकरी मुलांसाठी पर्यावरण शिक्षण उपक्रमांतर्गत पक्षी निरीक्षण, निसर्ग सहल, कचरा व्यवस्थापन यासारखे उपक्रम राबविणे गरजेचे आहे.

जगभर हा दिन साजरा केला जातो. कारण पृथ्वीवर असलेले प्राणी व वनस्पती यांची अन्नसाखळी मजबूत ठेवण्यासाठी जीवाची विविधता टिकणे महत्त्वाचे मानले जाते. यात अगदी सूक्ष्म जीवाणूंपासून ते हत्तीपर्यंत सर्वच जीव एकमेकाशी गुंतले आहेत. परिणामी प्रत्येकजण एकमेकाशी सहजीवन स्वीकार करूनच जगू शकतो असा नियमच आहे, असा समज आहे. मात्र आज असे सर्व बंद तुटताना व नष्ट होताना दिसून येतायेत आणि सर्वात हुशार प्राणी मानव या भूमातेला उजाड करीत असल्याचे चित्र सर्वांना पाहावयास मिळत आहे.

आज आपण सर्वांनी आपले परिसरातील ओढे जिवंत ठेवले पाहिजेत. कारण आपण या ओढय़ाकाठी केलेली अतिक्रमणे व प्रदूषण आपल्याला त्रासदायक ठरू लागल्याचे दिसून येत आहे. आजच्या दुष्काळात ओढे खोल व रुंद करणे शिवाय ओढय़ाला येणारे पाणी मातीरहित आले पाहिजे यासाठी आपण सर्वांनी गवताळ भागांचे संरक्षण केलेच पाहिजे तसेच समतलचर ही जागोजागी निर्माण केले पाहिजेत. यामुळे या परिसरात जैवविविधता वाढीस लागेल व परिसर जैवविविधता संपन्न होईल यात शंका नाही.

जगात जैवविविधता संपन्न असणारे अति संवेदनशील असे २५ भूभाग असून त्यात पश्चिम घाट व हिमालयाचा समावेश आहे. जगात सर्वात जास्त सजीवाचा नाश हा त्यांचा वस्तीस्थानाच्या नाशामुळे घडून आला. आपण नैसर्गिक संपन्न असणारे दोन प्रदेश हिंदुस्थानात आहेत आणि आपण हे प्रदेश वाचविणे आपली जबाबदारी आहे. कारण हे प्रदेश आपल्याला मुक्तपणे पाणी, हवा व अन्न देत आहेत. यांचा नाश म्हणजे आपलाच सर्वनाश समजावा.

अनेक प्रकारचे पक्षी कीटक खात असतात. मधमाशा परागीभवन करतात तर वटवाघळे रात्रभर फिरणाऱया व पिकांवर हैदोस घालणाऱया कीटकावर हल्ले करीत त्यांना खात असतात शिवाय रात्रभर दररोज वृक्षारोपणचे काम करीत असतात. मुंग्या सर्वत्र जमीन भुसभुशीत करण्याचे काम करीत असतात. वाळवीसारखा जीव तर जंगलाचे डॉक्टर म्हणूनच ओळखले जातात. अगदी काही दिवसांतच वाळलेल्या लाकडांचे खतात रूपांतर करतात. अर्थातच सर्वच जीव निसर्गाचे देणं देत असतात. त्यामुळे अन्नसाखळी मजबूत राहते. सहजीवन जंगण हा नियम आहे. पृथ्वीवरचा आणि हा नियम कठोर पण सत्य व वास्तववादी असल्याचे पाहावयास मिळते.

जगातील जैवविविधता जेवढी जास्त तेवढा सर्वांच्या जगण्यातील आनंद जास्त असतो आणि जेवढी जैवविविधता कमी तेवढा भकासपणा वाढत जातो. त्यामुळे जगण्यातील आनंद वाढवायचा असेल तर जैविक विविधता वाढवायलाच पाहिजे. सर्वांना जगण्याचा अधिकार आहे, मात्र मानवाने तो अधिकार स्वतःकडे घेतला आहे हे समजावून घेणे अपेक्षित. त्यामुळे जबाबदारी आपलीच आहे आता संवर्धन करण्याची.

यापुढे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणे ही प्रत्येक माणसाची जबाबदारी असून या मोहिमेमधील जैवविविधता वाचविण्यासाठी आपल्या परिसरापासून सुरुवात करणे आवश्यक आहे. आपल्या परिसरात मुंग्याची वारुळे जपावीत, मधमाश्यांच्या पोळ्यांचे जतन करावे, स्थानिक वृक्षारोपण करावे, पक्षी व वटवाघळांचे संरक्षण करावे, स्थानिक शिकारी लोकांचे प्रबोधन करावे, गवताळ व विविध अधिवासाचे संरक्षण करावे, वृक्षतोड बंद करावी, शेतीच्या बांधावर स्थानिक झाडे लावावीत तसेच बांध मोठे ठेवावेत, पाण्याचा वापर काटकसरीने करावा, मातीची धूप थांबवावी.

जैवविविधतेचा वापर काटकसरीने केल्यास आपण पर्यावरणपूरक जगू शकतो अन्यथा आपल्याला कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थितीशी सामना करावा लागेल. आजचा दुष्काळ नसून ही सद्य परिस्थिती अशीच कमी नैसर्गिक साधनसंपत्तीची आहे हे समजून घेतले पाहिजे. आजच्या दुष्काळी परिस्थितीत अनेक वन्यजीव नष्ट होताना दिसून येताहेत. यासाठी आपण त्यांना आपल्या घराशेजारी पाणी व धान्य ठेवून जगवू शकतो. कृपया आपण हे केल्यास एकतरी जीव आपल्यामुळे वाचेल याचे समाधान जगात सर्वात मोठे असेल…

(लेखक पर्यावरणतज्ञ असून निसर्ग जागर प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या