पाण्याखालचे अद्भुत विश्व

>> प्रसाद ताम्हनकर

आश्चर्य आणि अनोख्या बांधकामांनी सजलेले शहर अशी दुबईची ओळख आहे. जगातील श्रीमंत शहरांपैकी एक अशी ख्याती असलेल्या दुबईमध्ये जगातील सर्वात उंच इमारत, जगातील सर्वात मोठा मॉल कायम जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत आले आहेत. आता तर दुबईत चक्क जगातील सर्वात खोल जलतरण तलाव (स्वीमिंग पूल) देखील बनवण्यात आला आहे. सध्या येथे जगभरातील विविध ख्यातनाम लोकांना आमंत्रित केले जात असून, प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता विल स्मिथ याने काही काळापूर्वीच येथे जलतरणाचा आनंद लुटला आहे.

संयुक्त अरब अमिरातीच्या ‘पर्ल डायव्हिंग’ अर्थात समुद्रातील मोती शोधण्याच्या परंपरेवरून प्रेरणा घेऊन या सर्वात खोल जलतरण तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. दुबई शहरापासून केवळ पंधरा मिनिट अंतरावर असलेल्या ‘नादअलशेबा’ येथे हा गोडय़ा पाण्याचा जलतरण तलाव उभारण्यात आला आहे. येथे शोधकर्ता आणि पोहण्याचा आनंद लुटण्यास आलेले लोक 196 फूट (60 मीटर) खोलीपर्यंत जाण्याचा रोमांच अनुभवू शकतात. विशेष म्हणजे या जलतरण तलावाच्या खाली एका काल्पनिक शहराचे अवशेष उभारण्यात आले असून पाण्यात उतरून या शहराचा फेरफटका मारण्याचा विलक्षण अनुभवदेखील मिळवता येणार आहे.

या गोडय़ा पाण्याच्या तलावात तब्बल 14 दशलक्ष लिटर पाणी साठवण्यात आले आहे. या पाण्याचे तापमान अर्थात उष्णता 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवतादेखील येते. हा जलतरण तलाव बनण्याच्या आधी पोलंडमधील ‘डीपस्पॉट’ हा तलाव 45 मीटर (147 फूट) खोल असल्याने जगातील सर्वात खोल तलाव मानला जात होता. विशेष म्हणजे सध्या ब्रिटनमध्येदेखील एका खोल जलतरण तलावाची ‘ब्ल्यू ऑबिस’ बांधणी केली जात असून, त्याची खोली 50 मीटर (164 फूट) असणार आहे. खास करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बांधण्यात आलेल्या या जलतरण तलावात ऑलिंपिकच्या दर्जाचे सहा जलतरण तलाव आरामात सामावू शकतील इतका याचा आकार आहे, मात्र असे असूनही हा तलाव जगातील सर्वात मोठा तलाव मानला जाऊ शकत नाही. कारण वर उल्लेख केलेल्या ब्रिटनमधील ‘ब्ल्यू ऑबिस’ जलतरण तलावाचा आकार 17 ऑलिंपिक तलाव एकत्र सामावतील इतका असणार आहे. या जलतरण तलावाला विशेषतः रोबोटिक्स आणि अंतराळ सफरींच्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी तयार करण्यात आले आहे. जोडीलाच येथे स्कुबा डायव्हिंग आणि व्यावसायिक जलतरणपटूंसाठी मोफत डायव्हिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जलतरण शिकण्यास इच्छुक असलेल्या नवख्यांसाठीदेखील येथे विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या तलावात खोल उतरल्यानंतर येथे बुडालेल्या काल्पनिक शहराचा आनंद लुटता येणार आहे. त्या शहरात फेरफटकादेखील मारता येणार आहे. या शहरात विविध रस्ते, तिथे उभे केलेल्या कार, इथल्या भिंतीवर काढण्यात आलेली अनोखी चित्रे, मोठय़ा आकाराची झाडे या सगळ्याचा रोमांच अनुभवता येईल. या शहरात विविध आकाराच्या घरांना आणि चक्क एका लायब्ररीलादेखील भेट देता येणार आहे. या शहरात प्रकाश आणि ध्वनीची व्यवस्थादेखील देण्यात आली असून, एकूण 56 सीसीटीव्ही कॅमेऱयांच्या मदतीने या सगळ्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. जवळ जवळ 200 फूट खोल पाण्याखाली असलेल्या या शहराचा पूर्ण आनंद घेण्यासाठी पर्यटकांना अनेक वेळा डुबकी मात्र मारावी लागणार आहे.

[email protected]