MBBSला अ‍ॅडमिशन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, पुण्यात पाच जणांना 1 कोटी 32 लाखांचा गंडा

मुलांना एमबीबीएसला अ‍ॅडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने दोघांनी पाच जणांना तब्बल 1 कोटी 31 लाख 37 हजारांचा गंडा घातला. ही घटना सप्टेंबर ते डिसेंबर 2020 मध्ये घडली. या प्रकरणी राहुल यादव आणि समीर सिंग यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुहास ओव्हाळ यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुहास यांच्या मुलीला एमबीबीएसला अ‍ॅडमिशन घ्यायचे होते. त्यावेळी एका मित्राच्या ओळखीतून सुहास यांची आरोपी राहुल व समीर यांच्यासोबत ओळख झाली. दोघा आरोपींनी सुहास यांच्या मुलीला एमबीबीएसला अ‍ॅडमिशन मिळवून देतो असे सांगितले. त्यासाठी त्यांनी सुहास यांच्याकडून 30 लाख रूपये घेतले.

मात्र, रक्कम घेऊनही अ‍ॅडमिशन मिळवून दिले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुहास यांनी आरोपींविरुद्ध तक्रार दिली आहे. दोन्ही आरोपींनी पाच जणांच्या मुलांना एमबीबीएसला अ‍ॅडमिशन मिळवून देण्याचे सांगत 1 कोटी 31 लाख 37 हजारांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कपील भालेराव पुढील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या