मुंबईतील तीन हेरिटेज वास्तूंना ‘युनेस्को’चा पुरस्कार

360

सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तूंचे जतन करणाऱ्या मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनलेले मुंबईतील फ्लोरा फाऊंटन, भायखळा येथील अवर लेडी ऑफ ग्लोरिया चर्च आणि काळा घोडा येथील केनसीथ एलियाहू सिनेगॉग या तीन हेरिटेज वास्तूंना यंदाचा ‘युनेस्को एशिया-पॅसिफीक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ही मुंबईकरांसाठी एक अभिमानाची बाब आहे.

सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धनासाठी युनेस्कोकडून दरवर्षी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जातात. हिंदुस्थानातील चार हेरिटेज वास्तूंना हा पुरस्कार जाहीर झाला असून मुंबईतील तीन स्थळांसह अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटमधील विक्रम साराभाई लायब्ररीलाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

आशिया-पॅसिफिक प्रांतातील 14 देशांमधील 57 वास्तूंचा ज्युरींकडून आढावा घेतल्यानंतर हिंदुस्थानसह भूतान, चीन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील 16 वास्तूंना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. सरकारी आणि खाजगी संस्थांच्या भागीदारीत ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करण्याची प्रेरणा या पुरस्कारातून इतरांनाही मिळू शकेल, असा विश्वास युनेस्कोने व्यक्त केला आहे.

फ्लोरा फाऊंटन
स्थापत्य आणि शिल्पकलेचा अप्रतिम नमुना. 1864मध्ये उभारणी. रोमन देवता, कारंजे, हिंदुस्थानी उद्योगधंदे, धान्ये, फळे, झाडे आदींच्या प्रतिकृतीसह युवतीचा पुतळा अशा प्रकारचे हे शिल्प विशिष्ट प्रकारच्या पोर्ट लँड दगडापासून बनवण्यात आले आहे. मूळ ढाच्याला धक्का न लावता या वास्तूचे नूतनीकरण वास्तुविशारद विकास दिलवारी यांच्या टीमने अलीकडेच केले होते.

केनसीथ एलियाहू सिनेगॉग
हे यहुदी बांधवांचे प्रार्थनास्थळ 1884मधील आहे. मुंबईत येणारे इस्रायली नागरिक फोर्टमधील या सिनेगॉगला आवर्जून भेट देतात. नुकतेच या सिनेगॉगचे नूतनीकरण करण्यात आले.

विक्रम साराभाई लायब्ररी
1962मध्ये उभारलेल्या या लायब्ररीत 1 लाख 93 हजार पुस्तके आणि 24 हजारांहून अधिक ऑनलाईन जर्नल्स आहेत. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटची स्थापना करणारे विख्यात भौतिकशास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांचे नाव या लायब्ररीला देण्यात आले आहे.

अवर लेडी ऑफ ग्लोरिया चर्च
भायखळा-माझगाव येथील हा मुंबईतील सर्वात जुना रोमन कॅथलिक चर्च आहे. 1632मध्ये तो उभारण्यात आला होता. 1911 ते 1913 या कालावधीत या चर्चची गॉथिक शैलीत पुनर्बांधणी करण्यात आली होती. स्थापत्यकलेचा उत्तम नमुना पहायचा असेल तर या चर्चमधील डोम पहावा अशी ख्याती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या