अवकाळी पाऊस व गारपिट : पंचनामे झालेल्या नुकसानग्रस्तांना लवकरच आर्थिक मदत

33

सामना प्रतिनिधी, मुंबई

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीपिकांची नुकसानभरपाई देण्यासाठी झालेल्या नुकसानीची आकडेवारी पंचनामे करून मागविण्यात आली असून माहिती संकलित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे लवकरच नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेतील लेखी प्रश्नावर बोलताना दिली.

यासंदर्भात पंकज भुजबळ, कुणाल पाटील, जितेंद्र आव्हाड, नरहरी हिरवाळ, योगेश घोलप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. नाशिक विभागात माहे एप्रलि व मे २०१७ या कालावधीमध्ये वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ५५७३ हेक्टरवरील द्राक्ष, आंबा, डाळिंब व कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

धुळे तालुक्यातील वरगेडी, आर्णी, नावरा-नावरी, मोहाडी, डांगरी, नवलनगर, मळखेळा, काळगाव, काठखेडा, इच्छापूर, शिवार अक्कलपाडा या परिसरालाही पाऊस आणि गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले. तसेच नगरसह चाळीसगाव, पाचोरा व भडगाव (जि. जळगाव) तालुक्यांसह गिरणा परिसरालाही तडाखा बसला. यात शेतातील पिकांबरोबरच शेतकऱ्यांच्या घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ९ व १२ जूनला वादळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱयांचे सुमारे १७ ते १८ कोटींचे नुकसान झाले. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अचूक पंचनामे करून माहिती संकलित केली जाईल. त्यानंतर आर्थिक नुकसानीबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या