
येत्या 30 वर्षांत म्हणजे 2050 सालापर्यंत जगातील निम्मी लोकसंख्या ओव्हरवेट असेल. अनहेल्दी म्हणजेच पौष्टिकता नसलेला आहार हाच लठ्ठपणाला कारणीभूत ठरेल. जगातील सुमारे 150 कोटी लोक अशा खाण्यामुळे लठ्ठपणाशी झुंज देतील, अशी धक्कादायक माहिती जर्मनीच्या संशोधकांच्या अभ्यासातून समोर आली आहे.
जर्मनीच्या वैज्ञानिकांनी लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरून हे अनुमान काढले आहेत. पॉट्सडॅम इन्स्टिटय़ूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च या संस्थेने याबाबतचे संशोधन केले आहे.
सध्या लोक ज्या पद्धतीचा आहार घेत आहेत तसाच आहार पुढे चालू राहिला तर येत्या 30 वर्षांत लोकांच्या शरीरात पोषक घटकांची तीव्र कमतरता दिसून येईल. दुसरीकडे 30 वर्षांनंतर 50 कोटी लोकांचे वजन हे सरासरीपेक्षा कमी असेल. हे लोक भूक आणि काम या गोष्टींसाठी लढताना दिसतील, असे संशोधकांचा अभ्यास सांगतो.
अनहेल्दी आहाराचा ट्रेंड कसा सुरू झाला?
1965 सालापासून जगभरात खाण्यापिण्याच्या सवयींत बदल झाला. लोकांच्या अन्नात प्रोसेस्ड फूड, उच्च प्रथिनांचे मासांहार, जास्त साखर असणारे पदार्थ आणि कार्बोहायड्रेट समाविष्ट झाले.
हळूहळू प्रक्रिया केलेले अन्न तयार होऊ लागले. असे अन्न स्वस्त दरांत उपलब्ध होते आणि ते तयार करताना मशीनरीचा वापर होत असल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे शक्य होते.
प्रोसेस्ड फूडमध्ये पोषक मूल्ये कमी असतात. अशा अन्नात अनेक रसायनांचा वापर केला जातो.
या सर्व गोष्टींमुळे 2010 पर्यंत जगातील 29 टक्के लोकांचे वजन ओव्हरवेट झाले होते. 9 टक्के लोक लठ्ठपणाला तोंड देत होते.
हिंदुस्थान, अमेरिका, ब्रिटनमधील परिस्थिती?
हिंदुस्थानात 13.5 कोटी लोक लठ्ठपणाशी झगडत आहेत. तसेच इतर आजारांशीही लढा देत आहेत. हिंदुस्थानातील 7. 2 कोटी लोक मधुमेह आणि 8 कोटी लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. सीडीसी या अमेरिकेतील सर्वात मोठय़ा आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, 2009 आणि 2010 या काळात अमेरिकेतील 35. 7 टक्के लोक आधीच लठ्ठपणाने ग्रस्त होते. 2018 पर्यंत ही आकडेवारी 42.4 टक्क्यांपर्यंत वाढली होती. ब्रिटनमधील 28 टक्के लोक लठ्ठपणाचा सामना करत आहेत. जर्मन संशोधकांच्या मते, जगभरात लठ्ठपणाने हृदयरोग आणि मधुमेहांच्या रुग्णांमध्ये वाढ होईल. कोरोनासारख्या साथीत मृत्यूचा धोकाही वाढतो.