Budget 2021 work from home- घरून काम करणाऱ्यांना प्राप्तीकरात सवलत मिळणार ?

केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सामान्य करदात्यांना काय दिलासा देतात याकडे नोकरदार वर्गाचं लक्ष आहे.  कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे बदललेल्या कामाच्या पद्धती पाहाता घरून काम करणाऱ्या म्हणजेच वर्क फ्रॉम होम करणाऱ्या नोकरदारवर्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष सवलत दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

कोरोनाचा फैलाव वाढीला लागल्याने गेल्या वर्षी मार्च महिन्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली होती. फैलाव रोखण्यासाठी, लॉकडाऊनमुळे आणि वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने बहुसंख्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली होती.  अनेक कंपन्यांना कामाची ही पद्धत पसंत पडल्याने ती यापुढेही कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घरून काम करणं हे कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात जाऊन काम करण्यापेक्षा सोपं होतं. मात्र त्याचवेळी त्यांना कॉम्प्युटर, इंटरनेट, विजेसाठी बॅकअप, वातानुकूलन यंत्रणा यासाठी जास्तीचा खर्च करावा लागला.  काही मोजक्या कंपन्यांनी यासाठी येणारा खर्च हा त्यांच्या कर्मचाऱ्यांना परत (reimburse )दिला आहे.  गेल्या वर्षभराचा आढावा घेतल्यानंतर अनेक कंपन्यांना हे पटले आहे की कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्याऐवजी त्यांना घरून काम करून दिलं जाणं हे अधिक सोयीचे आहे.  या नव्या कार्यपद्धतीमुळे कंपन्यांची आर्थिक बचतही बोत आहे. यामुळे 1 फेब्रुवारी 2021 रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राप्तीकरामध्ये सवलत मिळू शकते अशी शक्यता आहे.

मनीकंट्रोलने प्रसिद्ध केलेल्या बातमीमध्ये त्यांनी एका सल्लागार संस्थेचे राहुल गर्ग यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध केली आहे.  गर्ग यांनी म्हटलंय की घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राप्तीकरात सवलत दिली पाहिजे, यामुळे त्यांच्या हातात येणाऱ्या पगाराची रक्कम वाढण्यास मदत होईल.  हातात पैसा आल्याने उत्पादनांची खरेदी वाढेल आणि त्याचा अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यास मदत होईल.  गर्ग यांनी म्हटलंय की घरातून काम करत असताना कर्मचारी घरामध्ये कामासाठी जो खर्च करतो तो त्याच्या करपात्र उत्पन्नातून वजा केला पाहिजे.  यामुळे त्याला करापोटी कमी रक्कम भरावी लागेल आणि उत्पन्नातील अधिकचा पैसा त्याच्या हातात राहील.  फिनोलॉजी एडींगचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल कामरा यांनी म्हटलंय की काही कंपन्या या कर्मचाऱ्यांना परतावा (Reimbursement) देतात खऱ्या मात्र तो देखील करपात्र असतो त्यामुळे कामरा यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राप्तीकरात सवलत मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या