बीएसएनएलच्या नियम निष्ठूरतेने घेतले 30 वर्षीय तरुणाचे प्राण

यवतमाळ जिह्यातील चैतन्य अवथारे याला नवव्या वर्षी ‘गौचर’ या दुर्धर रोगाची लागण झाली. प्रकाश अवथारे बीएसएनएलमध्ये असल्याने त्यांनी उपचारांवरील खर्चासाठी बीएसएनएलच्या आरोग्य योजनेचे दरवाजे ठोठावले. चैतन्यच्या वयाच्या नवव्या वर्षापासून उपचारांसाठी मदत मिळविण्याचा प्रयत्न करणाऱया अवथारे यांना बीएसएनएलने मात्र आता चैतन्य 21 वर्षांचा झाला सांगत मदतीस नकार दिला.

तरीही हार न मानता प्रकाश यांनी केंद्रीय आरोग्य योजनेतून मदतीचा प्रयत्न केला, मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. यासंदर्भात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर मदत मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ही मदतीची प्रक्रिया पार पडेपर्यंत वयाच्या 30व्या वर्षी चैतन्यने उपचाराअभावी प्राण सोडले.

चैतन्यला झालेला आजार हा दुर्मिळ अनुवांशिक आजार म्हणून ओळखला जातो. नवव्या वर्षी याचे निदान झाल्यानंतर यासाठी केईएम रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र बीएसएनएलच्या नोकरीत असले तरी हा उपचारांचा खर्च परवडणारा नसल्याने त्यांनी बीएसएनएलच्या आरोग्य योजने अंतर्गत पाठपुरावा केला.

बीएसएनएलने आपल्याच कर्मचाऱयांच्या मुलाच्या उपचारावरील खर्चास हात वर केल्यानंतर केंद्रीय आरोग्य योजनेकडे त्यांनी मदतीसाठी प्रयत्न केले. मात्र तिथेही योग्य सहकार्य न मिळाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

न्यायालयाच्या आदेशानंतरही 2 वर्षांचा काळ लोटला

अवथारे पुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार 11 जानेवारी 2018 रोजी 10 लाख रुपये मदत देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने 18 डिसेंबर रोजी म्हणजे जवळजवळ 11 महिन्यांनी अवथारे कुटुंबाशी संपर्क साधून 10 लाख रुपये वर्ग करण्यासाठी रुग्णालयाचा पत्ता तसेच अन्य तपशील मागितला.

मात्र दरम्यानच्या काळात चैतन्यचा आजार आणखीनच बळावला. केईएम, यवतमाळ येथील वसंतराव नाईक सरकारी रुग्णालय तसेच पुण्यातील ससून रुग्णालयातही उपचारांसाठी दरवाजे ठोठावले; पण कुणीच दाखल करून घेतले नाही, अशी व्यथा अवथारे यांनी व्यक्त केली.

14 डिसेंबरला चैतन्यने अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. सरकारी अधिकाऱयांची सुस्त व उदासीन वृत्ती हीच चैतन्यच्या मृत्यूस कारणीभूत आहे, असा आरोप अवथारे कुटुंबीय आणि ‘लिसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर सपोर्ट सोसायटी’कडून करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या