रिफायनरीच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्र्याचे बारा तासात घुमजाव

चंद्रपुरात पेट्रोलियम रिफायनरी उभारण्याच्या मुद्द्यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी बारा तासाच्या आत घुमजाव केले आहे. भाजपच्या गुरुवारी झालेल्या जाहीर कार्यक्रमात चंद्रपुरात वीस मेट्रिक टनाची रिफायनरी उभारण्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र, आज पत्रपरिषदेत या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना याबाबत मी निर्णय घेऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी बारा तासातच घुमजाव केले आहे.

याआधी दिल्ली येथील रोहिंग्याना घरे देण्याच्या मुद्द्यावरही शहरी आवास मंत्रालय सांभाळणाऱ्या पुरी यांच्याविषयी वाद निर्माण झाला होता. महाराष्ट्रात नाणार रिफायनरी एक मोठा राजकीय मुद्दा  झाला आहे. स्थानिकांचा विरोध असल्याने रिफायनरी रेंगाळली आहे. राज्यात नवे सरकार पदारूढ झाले आहे. मात्र ठोस निर्णय होत नसताना नाणारची क्षमता विभागून 3 ठिकाणी रिफायनरी उभारण्याचे प्रयत्न प्राथमिक स्तरावर होत आहेत. विशेष म्हणजे चंद्रपूर सर्व प्रकारच्या प्रदूषणात देशात अग्रस्थानी असताना रिफायनरीची थेट घोषणा पुरी यांनी केली होती. त्यानंतर बारा तासातच त्यांनी घुमजाव केले आहे. या त्यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे भाजप नेते आणि कार्यकर्ते यांच्यात संभ्रम आहे.