विसर्जनाच्या दिवशीच ते घडवतात शुभारंभाची मूर्ती !

37

जे. डी. पराडकर, संगमेश्वर

व्यवसाय मग तो कोणत्याही प्रकारचा असो त्यामध्ये परंपरेला आणि तत्वांना महत्व दिल्यास अपेक्षित यश दूर नसते. कोकणात गणेशमूर्ती तयार करण्याकडे पूर्णतः व्यवसाय म्हणून न पाहता श्रद्धेच्या भावनेनेही याकडे पाहिले जाते. कोकणातील गणेशमूर्ती कारखानदार अनंत चतुर्दशीला म्हणजे गणेश विसर्जनाच्याच दिवशी पुढील वर्षीची शुभारंभाची मूर्ती घडवून कारखान्यातील कामाला सुरुवात करण्याची प्रथा गेली अनेक वर्षे जोपासत आहेत . कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात जशी गणेश पूजनाने होते तद्वत गणेश मूर्ती कारखान्यात अनंत चतुर्दशीला नवीन गणेश मूर्ती घडवून शुभारंभ करण्याची प्रथा निश्चितच आगळीवेगळी म्हटली पाहिजे.

कोकणातील बहुतांशी गणेशमूर्ती कारखाने परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेले आहेत. काही कारखान्यांना शंभर वर्षांपेक्षा अधिक कालावधीची अखंड परंपरा आहे . परिणामी गणेशमूर्ती कारखान्याच्या सुरुवातीपासून ज्या प्रथा आणि परंपरा आहेत त्या पाळण्यावर या कारखांदारांकडून अधिक भर दिला जातो. गणेशमूर्ती कारखान्यांमधून गणेशोत्सवानंतर सरस्वतीच्या मूर्ती तयार काम हाती घेतले जाते, तर काही कारखान्यांमधून नवरात्रोत्सवानंतर बाळगोपाळांच्या गड किल्ल्यांसाठी मावळे, शिवाजी महाराज याच्या मातीच्या प्रतिमा तयार करण्याचे काम सुरू होते. याच बरोबर ज्या ज्या वेळी मोकळा वेळ मिळेल त्यावेळी गणेशमूर्ती तयार करून ठेवल्या जातात. यासाठीच अनंत चतुर्दशीला शुभारंभाची मूर्ती घडवून कामाची सुरुवात करण्याची पद्धत कोकणात फार पूर्वी पासून रुढ आहे .

अनंत चतुर्दशीला गणपतींचे विसर्जन होण्याआधी एक मूर्ती घडवून ठेवली जाते. विसर्जन झाल्यानंतर या मूर्तीचे मातीकाम पूर्ण करून पूजन केले जाते. या पूजनानंतर कारखान्यात कधीही माती करण्यास मुभा असते. पुढे वर्षभर ही मूर्ती कारखान्यात न रंगवता ठेवून तिची पूजा केली जाते. पुढे अनंत चतुर्दशीला या मूर्तीचे विसर्जन करून त्या जागी त्याच दिवशी दुसरी मूर्ती नव्याने घडवून ठेवली जाते.

गेल्या ६० वर्षांपेक्षा अधिक काळ गणेशमूर्ती तयार करण्याच्या व्यवसायात असणारे संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे येथील गंगाधर पुरुषोत्तम ढोल्ये हे आज ९० वर्षांचे आहेत. मात्र हे अनुभवी हात आजही गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामात व्यग्र असतात. अनंत चतुर्दशीला नवीन मूर्ती छापण्याच्या प्रथेबाबत बोलतांना ते म्हणाले की, गेल्या ६० वर्षात आपण अनंत चतुर्दशीला शुभारंभाची मूर्ती घडवण्याची प्रथा सोडलेली नाही. आपल्या कारखान्यात ही प्रथा पुढेही अखंडपणे सुरू राहील असे ढोल्ये यांचं म्हणणं आहे. संगमेश्वर येथे ऋषिकांत शिवलकर यांचा गणेश मूर्ती तयार करण्याचा कारखाना आहे . आता हा कारखाना त्यांचे चिरंजीव तुषार आणि मंदार हे दोघे पाहतात. सध्या विविध कारणांनी सध्या शाडूच्या गणेशमूर्ती तयार करणे परवडत नाही, परिणामी बरेचसे कारखानदार पीओपीच्या तयार मूर्ती आणून केवळ रंगकाम करून देण्याचे काम करतात. असे असले तरीही अनंत चतुर्दशीला शाडूच्या मातीत शुभारंभाची मूर्ती घडवण्याची प्रथा कोणताही कारखानदार सोडत नाही.

summary-unique legacy of ganesh idol making in sangameshwar

आपली प्रतिक्रिया द्या