येत्या आठ वर्षांत हिंदुस्थान लोकसंख्येत जगात अव्वल- संयुक्त राष्ट्र

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

येत्या आठ वर्षांत हिंदुस्थान लोकसंख्येच्या बाबतीत चीनलाही मागे टाकणार असून जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून हिंदुस्थान ओळखला जाईल असा दावा संयुक्त राष्ट्राने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात केला आहे.

संयुक्त राष्ट्राने सोमवारी लोकसंख्येवर आधारित असलेला एक अहवाल प्रसिद्ध केला. यात 2050 पर्यंत हिंदुस्थानची एकूण लोकसंख्येत 27 कोटी 30 लाख एवढी वाढ झाली असेल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस 2019’ नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तसेच सध्या हिंदुस्थानची लोकसंख्या अंदाजे 1.37 अब्ज तर चीनची लोकसंख्या जवळ जवळ 1.43 अब्ज एवढी आहे. पण हिंदुस्थानचा जन्मदर पाहता 2027 पर्यंत लोकसंख्येच्या बाबतीत हिंदुस्थान चीनलाही मागे टाकेल, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राच्या डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अॅड सोशल अफेयर्सच्या पॉप्युलेशन डिविजनच्या सर्वेक्षण अहवालात हिंदुस्थानची लोकसंख्या 2050 पर्यंत 2 अब्जाहून अधिक असेल जी इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक असेल असा दावा यात करण्यात आला आहे.

तर चीनसह इतर 55 देशांमधील लोकसंख्या घटत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. 2027 साली लोकसंख्येच्या बाबतीत हिंदुस्थान चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होईल असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.