“हा गांधीवादी विचारसरणी अन् हिंदुस्थानच्या मूल्यांसोबत केलेला विश्वासघात”, राहुल गांधींवरील कारवाईचे अमेरिकेत पडसाद

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाने देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. देशात विविध ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. आता या कारवाईचे पडसाद अमेरिकेतही उमटले आहेत. हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन खासदार रो खन्ना (Ro Khanna) यांनी या प्रकरणी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द करणे हा गांधीवाधी विचारसरणी आणि हिंदुस्थानच्या मूल्यांसोबत केलेला विश्वासघात आहे. माझ्या आजोबांनी ज्यासाठी त्यांच्या आयुष्याची अनेक वर्ष तुरुंगात घालवली तो हा हिंदुस्थान नाही, अशा शब्दात रो खन्ना यांनी राहुल गांधींवरील कारवाईचा निषेध केला आहे. यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये सिलिकॉन व्हॅलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रो खन्ना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या प्रकरणात हस्तक्षेपाची मागणी केली आहे.  हिंदुस्थानच्या लोकशाहीच्या हितासाठी तुमच्याकडे हा निर्णय बदलण्याची ताकद आहे, असे त्यांनी मोदींना टॅग करून म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

राहुल गांधी यांनी 2019मध्ये कर्नाटकात बोलताना ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का?’ असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याविरोधात गुजरातमधील भाजपचे आमदार पुर्णिश मोदी यांनी सुरत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. गुरुवारी न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवताना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि 30 दिवसांचा जामीनही दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

लोकसभाध्यक्षांची तत्परता

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होणार अशी चर्चा होती; मात्र सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ती तत्परता दाखवली आणि राहुल गांधी यांना लोकसभेतून बाहेर काढण्याची घाई केली, त्या तत्परतेवरच आता विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. याआधी या कायद्यान्वये काही खासदारांवर कारवाई झाली आहे, पण ती 24 तासांच्या आत झाली नव्हती, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.