युवा सेनेच्या पाठपुराव्यामुळे अखेर विद्यापीठाने एमए, एमकॉमच्या परीक्षा पुढे ढकलल्या

सामना प्रतिनिधी । मुंबई

परीक्षा घेण्यासाठी शैक्षणिक सत्र सुरू होऊन ९० दिवस होणे अनिवार्य असताना विद्यापीठाने २७ दिवसांतच एमए, एमकॉमच्या परीक्षा आयोजित केल्या होत्या. मात्र युवा सेनेने याला जोरदार विरोध केल्यानंतर या परीक्षा विद्यापीठाने पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. एमए, एमकॉमची प्रवेश प्रक्रिया ३० नोव्हेंबरला संपली. मात्र परीक्षा विभागाने विद्यापीठ कायदा धाब्यावर बसवून अनिवार्य कालावधी होण्याआधीच या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. यामुळे अभ्यासक्रम शिकवून झालेला नसताना अभ्यास कसा करणार आणि परीक्षा कशी देणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे हजारो विद्यार्थी टेन्शनमध्ये आले होते. याबाबत युवा सेना शिष्टमंडळाच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देऊन परीक्षा पुढे ढकलण्याची मागणीही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, विद्यापीठाने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी लॉच्या परीक्षाही पुढे ढकलाव्यात अशी मागणी माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली आहे.