उदगीरमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह, खून झाल्याचा संशय

अभय मिरजकर, लातूर

उदगीर तालूक्यातील वाढवण्या पासून जवळच असलेल्या एकुर्का रोड ते कल्लूर या मर्गावरील मारुती मंदिराजवळ एका अनोळखी पुरुषाचे प्रेत अर्धनग्न अवस्थेत सापडले आहे. खून करून मृतदेह फेकून दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

सविस्तर वृत्त असे की, नांदेड बिदर राज्य मार्गावरील एकुर्का रोड वरील मारोती मंदिराजवळ आज सकाळी एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळून आले. त्या व्यक्तीच्या अंगावर अंतर्वस्त्र व शर्ट फाटलेल्या अवस्थेत असून त्या प्रेतावर बऱ्याच ठिकाणी मारल्याच्या खुणा आहेत. घटना कळताच वाढवण्याचे सहपोलीस निरीक्षक शेख व मुख्य पोलीस शिपाई विनायक कांबळे घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून प्रेताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून अद्याप ओळख पटलेली नाही. सदर प्रेताच्या अंगावरील शर्टावर एका टेलरच्या दुकानाचे नाव आहे. एवढीच ओळख सध्या पोलिसांसमोर आहे. इतरत्र खून करून मृतदेह फेकून दिल्याचे दिसून येत असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या