श्रीमंत दगडूशेठ मंदीर ट्रस्टच्या कोषाध्यक्षांना पार्सल; संशयास्पद काहीही नसल्याने सुटकेचा निश्वास

879

पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर समितीच्या कोषाध्यक्षांना सोमवारी जम्मू कश्मीरमधून एक पार्सल आले होते. त्यावर जम्मू कश्मीरमधील इरशाद नावाच्या व्यक्तीचे नाव होते. त्यामुळे पार्सलचा संशय आल्यामुळे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी तातडीने विश्रामबाग पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार विश्रामबाग पोलिसांनी बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथकाला पाचारण केले होते. पाऊण तासाच्या तपासणीमध्ये पार्सलमध्ये अक्रोड आणि केशर असल्याचे आढळले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर समितीचे कोषाध्यक्ष सूर्यवंशी यांच्या घरी सोमवारी दुपारी जम्मू कश्मीरमधून पार्सल आले. त्यावर पाठविणाऱ्याचे नाव इरशाद होते. मात्र, जम्मूमध्ये अशी कोणतीही ओळखीची व्यक्ती नसल्यामुळे त्यांनी तातडीने ही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार बीडीडीएस पथकाने पार्सल ताब्यात घेऊन रमणबाग शाळेच्या मैदानावर नेले. त्याठिकाणी 15 ते 18 जणांच्या टीमकडून पार्सलची तपासणी करण्यात आली. त्यावेळी पार्सलमध्ये अक्रोड आणि केशर असल्याचे दिसून आले. पार्सलची सुमारे पाऊण तास तपासणी करण्यात आल्यानंतर त्यामध्ये काहीही संशयास्पद नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांसह मंदीर समिती ट्रस्टच्या कोषाध्यक्षांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. जम्मू कश्मीरमधून प्राप्त पार्सलवर ओळख नसलेल्याचे नाव होते. त्यामुळे संशय आल्यामुळे पोलिसांना माहिती देउन पार्सल त्यांच्याकडे दिले, असे महेश सूर्यवंशी यांनी सांगितले.

महेश सूर्यवंशी यांचे एक मित्र जम्मू कश्मीरमध्ये लष्करात जवान आहेत. त्यांनी तेथील इरशाद नावाच्या दुकानदाराला महेशला अक्रोड आणि केशरचे पार्सल पाठवण्यासाठी सांगितले होते. मात्र, दुकानदाराने पार्सल पाठविताना स्वतःचे नाव टाकल्यामुळे संशय निर्माण झाला होता. पार्सलमध्ये अक्रोड आणि केशर आढळून आले आहे.
-दादासाहेब चुडाप्पा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग

आपली प्रतिक्रिया द्या