अनलॉकच्या महिन्यातही कोरोना आटोक्यात! 1200 ठिकाणे निर्बंधांच्या कचाटय़ातून सुटली

कोरोना नियंत्रणात आल्यामुळे महाराष्ट्रात 6 जूनपासून ‘अनलॉक’ प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही मुंबईत कोरोना आटोक्यात असल्याचे समाधानकारक चित्र समोर आले आहे. गेल्या महिनाभरात चाळी-झोपडपट्टय़ांमधील कंटेनमेंट झोन, सील इमारती व मजल्यांमधील तब्बल 1228 ठिकाणे निर्बंधांच्या कचाटय़ातून सुटली असून 4 लाख 42 हजार रहिवाशांनी मोकळा श्वास घेतला आहे. शिवाय महिनाभरात रुग्ण दुपटीचा कालावधी 300 दिवसांनी वाढून 850 दिवसांपार गेला आहे.

मुंबईत कोरोना आटोक्यात आल्यानंतर फेब्रुवारीच्या मध्यावर पुन्हा दुसरी लाट आल्याने मुंबईचे टेन्शन वाढले होते. मात्र राज्य सरकारने घातलेले निर्बंध आणि पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे मुंबईत कोरोनाची दुसरी लाटही आटोक्यात आली आहे.  कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे महिनाभरापूर्वी राज्यात पाच टप्प्यात ‘अनलॉक’ प्रक्रिया सुरू करण्यात आली. चाचण्यांच्या प्रमाणात 5 टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेड व्याप्तीचे प्रमाण 25 टक्क्यांपेक्षा कमी असणाऱ्या ठिकाणी नियम शिथिल करण्यात आले. मुंबईतही सर्वांसाठी लोकल वगळता अनेक नियम शिथिल करून सर्व दुकाने शनिवार-रविवार वगळता दुपारपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली. तरीदेखील मुंबईतील कोरोना नियंत्रणात असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

24 पैकी 19 वॉर्ड कंटेनमेंट झोनमुक्त!

महिनाभरापूर्वी मुंबईत चाळी-झोपडपट्टय़ांमध्ये 26 कंटेनमेंट झोन होते. यामध्ये महिन्यात निम्म्याने घट होऊन सद्यस्थितीत केवळ 13 कंटेनमेंट झोन शिल्लक आहेत. विशेष म्हणजे 24 पैकी 19 वॉर्डमध्ये एकही कंटेनमेंट झोन नाही. तर तीन विभागात प्रत्येकी दोन तर उर्वरित दोन प्रभागांत 3 आणि 4 असे कंटेनमेंट झोन आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या