उन्नाव बलात्कारातील साक्षीदार युनुसचा पुरलेला मृतदेह काढला बाहेर

सामना ऑनलाईन । उन्नाव

उन्नाव सामूहिक बलात्कारातील साक्षीदार युनुसचा मृतदेश शनिवारी रात्री उशिरा बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. बुधवारी रहस्यमयरित्या युनुसचा मृत्यू झाला होता. त्यानंतर स्थानिक दफनभूमीत त्याचा मृतदेह पुरण्यात आला. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी युनुसच्या कुटुंबीयांनी पोलिसांची परवानगी घेतली नव्हती. जेव्हा युनुसच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तेव्हा शवविच्छेदनासाठी पोलिसांनी युनुसचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी विनंती केली होती.

पण असे करणे म्हणजे शर्रियतच्या विरोधात आहे असे युनुसच्या नातेवाईकांनी सांगितले. यासाठी युनुसचे नातेवाईक मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना भेटायला गेले. पण मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने युनुसच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. लखनऊ पोलिसांनी त्यांना रोखून ताब्यात घेतले. या दरम्यान पोलीस आणि उन्नाव जिल्हा प्रशासनाने शनिवारी रात्री उशिरा मुस्लीम धर्मगुरूंच्या देखरेखीखाली युनुसचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाल्याने प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदबोस्त ठेवला.