चीनमधील ‘स्वातंत्र्य’चळवळी

ब्रिगेडियर हेमंत महाजन

[email protected]

चीनमध्ये सध्या प्रचंड वांशिक तणाव आहेत. तेथे हानवंशीयांच्या हाती सत्तेची सूत्रे एकवटली आहेत. यामुळे ‘बिगरहान’ असंतुष्ट असतात व हानवंशीयांविरुद्ध आवाज उठवतात. तिबेट, शिनजियांग, मंगोलिया व तैवान येथील ‘स्वातंत्र्या’च्या चळवळी हा चीनच्या सुरक्षिततेला असलेला मोठा धोका आहे. शिनजियांग हा मुस्लिमबहुल भाग आहे. या प्रांताची सीमारेषा कझाकीस्तान, अझरबैझान या व अफगाणिस्तान तसेच पाकिस्तानसारख्या देशांशी आहे. तेथे गेली अनेक वर्षे फुटीरतावादी चळवळ जोरात आहे. या लढय़ाला प. व मध्य आशियातील मुस्लिम फुटीरतावाद्यांची फूस आहे.

चीनमधील शिनजियांग प्रांतातील मुस्लिम समाजाला ‘उईगूर’ असे म्हणतात. त्यांच्यानुसार हा प्रांत चिनी साम्राज्याचा कधीही भाग नव्हता म्हणून ते विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून वेगळय़ा देशाच्या मागणीसाठी लढत आहेत. या मागणीसाठी त्यांच्या अनेक संघटना आहेत. त्यातील काही संघटना दहशतवादी कृत्ये करत असतात.

या प्रांतात तुर्कमेनी वंशाचे उईगूर मुस्लिम बहुसंख्य होते. त्यांची पद्धतशीर गळचेपी केली गेली. चीनने मोठय़ा प्रमाणात ‘हान’ समाजाला शिनजियांगमध्ये स्थलांतरित होण्यासाठी उत्तेजन दिले. १९५० साली शिनजियांगमध्ये ‘उईगूर’ मुस्लिमांची एकूण लोकसख्या ९० टक्के होती. तीच आता ४८ टक्के आहे. चिनी भाषा व लिपीची सक्ती तर झालीच, शिवाय कोणत्याही स्वरूपाच्या नोकऱ्या किंवा व्यवसायात चिनी येणाऱ्यांनाच प्राधान्य देण्याचे धोरण झाल्याने ‘उईगूर’ भाषा, संस्कृती, धर्म या सर्वांवरच घाला येऊ लागला. शिनजियांगची राजधानी उरुम्कीत हानवंशीय चिन्यांचे प्राबल्य आहे. यामुळे ‘उईगूर’ समाजात चीनबद्दल विलक्षण राग असतो. स्थानिक पातळीवरसुद्धा सत्तेच्या सर्व जागा ‘हान’वंशीयांच्या हातात असतात. म्हणजे ‘उईगूर’ त्यांच्याच प्रांतात सत्ताहीन झालेला आहे. यामुळेच आता त्यांच्या चळवळी अधिकाधिक रक्तरंजित झाल्या आहेत. ‘उईगूर’ मुसलमानांच्या चळवळीला १९९१ सालापासून जोर चढलेला दिसत आहे. या वर्षी ‘सोव्हिएत युनियन’चे विघटन झाले व आशियात कझाकीस्तान, अझरबैजान, उजबेकीस्तान असे अनेक नवे मुस्लिम देश अस्तित्वात आले. यामुळे ‘उईगूर’ मुसलमानांना वाटायला लागले की जर ‘सोव्हिएत युनियन’चे विघटन होऊ शकते तर चीनचे का नाही? शेजारच्या मुस्लिम देशांकडून ‘उईगूर’ मुसलमानांना मदत मिळायला लागली. यामुळेसुद्धा ‘उईगूर’ मुसलमानांच्या चळवळीला जोर आलेला आहे. माओने १९४९ साली मार्क्सवादी क्रांती केल्यानेतर तिबेटप्रमाणे शिनजियांग प्रांतात सैन्य घुसवले व हा प्रांत कायमस्वरूपी चीनशी जोडून घेतला.

शिनजियांग प्रांतात सतत दहशतवादी हल्ले होत असतात. जानेवारी 2017 मध्ये दक्षिण शिनजियांग प्रांतात झालेल्या बॉम्बस्फोटात आठ लोक मारले गेले होते. तेथील दहशतवादी व फुटीरतावादी शक्तींना शेजारच्या मुस्लिम देशांकडून सर्व प्रकारची मदत मिळत असते. यात जास्त मदत अफगाणिस्तानातून होत असते. पाकिस्तान, अफगाणिस्तानात ‘उईगूर’ मुसलमानांना दहशतवादी कृत्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातच आता मध्य व पश्चिम आशियातून परागंदा होणारे मूलतत्त्ववादी या प्रांतात घुसत असून त्यांच्यामुळे चीनला दहशतवादी कारवायांचा धोका असल्याची भीती वाटते आहे. चीनने या प्रांतात दडपशाहीचा अवलंब सुरू केला असून त्यातून वातावरण चिघळत आहे.

चीनने काही महत्त्वाकांक्षी आर्थिक व सामरिक योजना आखल्या आहेत. चीनला मध्य आशिया, पश्चिम आशियाच्या राजकारणात स्वतःचे आर्थिक स्थान मजबूत करायचे आहे. याकरिता पाकिस्तानमधील ग्वादर हे अत्याधुनिक बंदर तयार झाल्याने तर चीनच्या ताब्यात असेल. या बंदराच्या माध्यमातून चीनला या भागात व्यापार वाढवता येईल. चीनच्या इतर भागांत बनलेला माल पश्चिम आशियात पाठवण्यासाठी चीन शिनजियांग प्रांतातून मोठा महामार्ग बांधत आहे. ‘चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडार’ जर यशस्वी व्हायचा असेल तर चीनला शिनजियांग प्रांत तर स्वतःच्या ताब्यात ठेवणे आणि तेथे शांतता असणे गरजेचे आहे.

शिनजियांग प्रांतातील फुटीरतावादी शक्तींना पाकिस्तानात असलेले दहशतवादी गट मदत करत असतात. त्यांना थांबवणे पाकिस्तानला शक्य झालेले नाही. १९६०च्या दशकात पाकिस्तानने चीनला पाकव्याप्त कश्मीरमधील जमिनीचा मोठा तुकडा दिला होता. तेव्हापासून चीन व पाकिस्तान यांच्यात हिंदुस्थानविरोधी भक्कम आघाडी निर्माण झाली आहे. त्याच काळात चीनने या भागातून ‘काराकोरम’ महामार्ग बांधला. यामुळे चीनला हिंदुस्थानविरोधी कारवाया करण्यास व ‘अक्साई चीन’ भागावरील ताबा पक्का करण्यास मदत झाली. आता ‘काराकोरम’ महामार्गाचा ‘उईगूर’ मुसलमानांना मदत करणारे दहशतवादी वापर करत आहेत.

शिनजियांग प्रदेशात पाकिस्तानातील दहशतवादी घुसू नयेत याची चीन कसोशीने काळजी घेतो आहे. मात्र २००८, २०१४, २०१६-१७ मध्ये चीनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे चिनी राज्यकर्त्यांना धक्का बसला. त्यात पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या सरहद्दीवर कार्यरत असणाऱ्या दहशतवाद्यांचा हात असल्याचे आढळून आल्याने शिनजियांग प्रांताविषयी चीन अधिक कठोर भूमिका घेत आहे. आता सीरिया व इराकमधील इसीस आणि अल कायदाचे परागंदा दहशतवादी या प्रांताच्या जवळपास लपून बसल्याची शक्यता वर्तविण्यात येते. त्यामुळे चीनने काशगरपासून सर्व ठिकाणी अभूतपूर्व बंदोबस्त ठेवला आहे. उरुम्कीसह या प्रांतात आता ठिकठिकाणी कधीही लष्कराच्या तुकडय़ा रस्त्यावर येऊन ब्लॉकेडस् करत आहेत. त्यामुळे जनजीवन ठप्प होत असून हानवंशीय चिन्यांनाही त्याचा फटका बसू लागला आहे. शिनजियांगमध्ये (पर्यायाने चीनमध्ये) दहशतवादी घुसता कामा नयेत आणि या प्रांतातील दुर्गम भागात जिथे त्यांचे अड्डे असतील ते उद्ध्वस्त करण्याचे आदेश त्यांनी लष्कर व पोलिसांना दिले आहेत.

अर्थात शिनजियांगबाबत चीनने आततायी धोरण स्वीकारल्यास त्याचे परिणाम चीनला पाकिस्तान व मध्य आशियात भोगावे लागतील आणि अन्य मुस्लिम देशांची नाराजीही सहन करावी लागेल. शिनजियांगचे लोण तिबेटमध्येही पसरण्याची भीती आहेच. त्यामुळे चीनने या प्रांतावरील पोलादी पकड अजूनच मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. ज्याप्रमाणे चीन हिंदुस्थानला पाकिस्तानबरोबर लढवत ठेवतो तसेच आता आपण चीनला त्यांच्या पश्चिमेच्या प्रांतात लढवत ठेवावे लागेल. जर चीन पाकिस्तान, ईशान्य हिंदुस्थानातील बांगलादेशी घुसखोरी, बंडखोरी आणि माओवादाला मदत करत असेल तर आपणही तिबेटींचा संघर्ष सुरू ठेवायला आणि झिनजियांगमधील स्वातंत्र्यचळवळीला मदत करायला हवी.

आपली प्रतिक्रिया द्या