दापोलीत एकीकडे अवकाळी पाऊस, तर दुसरीकडे पसरतेय दाट धुके

मिनी महाबळेश्वर, असे म्हटल्या जाणाऱ्या दापोली शहरात एकीकडे अवकाळी पावसाची बरसात होतेय, तर दुसरीकडे मात्र दाट धुक्यांची चादर पसरतेय. हा दुर्मिळ योग सध्या दापोलीकरांना पाहावयास मिळत आहे.

मंगळवारी, 21 मार्च रोजी दिवसभरात दोन वेळा अवकाळी पावसाची बरसात झाली. यावेळी वातावरणात उकाडा जाणवू लागल्याने अंगाची काहिली काहिली होत होती. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी म्हणजे गुरुवारी, 23 मार्च रोजी सकाळी सर्वत्र दाट धुके पसरलेले सर्वांना पहावयास मिळाले.

गेल्या पंधरा दिवसांपासून दापोलीत कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना अचानकपणे 21 मार्च रोजी अवकाळी पाऊस बरसला आणि आंबा, काजू बागायतदारांना नुकसानीच्या चिंतेने ग्रासले. अवकाळी पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सकाळीच दापोलीत नागरी वस्तीत सर्वत्र दाट धुके पसरल्याने आल्हाददायक थंडाव्याचा शिडकावा अंगाला सुखद धक्का देऊन गेला. उष्णतेच्या उकाड्याने अंगाची लाही लाही होत असताना अचानकपणे निसर्ग बदलाच्या या रूपाने सारेजण चांगलेच सुखावून गेले, मात्र धुक्यामुळे रस्त्यासमोरून येणारी वाहने व पादचारी नागरिकांना चाचपडत चालावे लागत होते.

गेले काही दिवस दापोलीत दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत होता. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रावर 12 मार्चला तापमानाची नोंद 36.8, 13 मार्च रोजी 36.2, 14 मार्च रोजी 36.5, 15 मार्च रोजी 35.0, 16 मार्च रोजी 34.0, 17 मार्चला 32.0, 18 मार्च रोजी 31.8, 19 मार्च रोजी 31.2 तर 20 मार्च रोजी 30.0 आणि 21 मार्च रोजी 29.5 अंश सेल्सिअस अशी तपमानाची नोंद झाली.

21 मार्च रोजी अवकाळी पाऊस कोसळला, तर 22 मार्च रोजी 30.0 अशे सेल्सियस, गुरुवारी 23 मार्चला परत 30.3 अंश सेल्सिअस अशा प्रकारची तापमानाची नोंद झालेली आहे. कमी-अधिक प्रमाणात तापमानाची नोंद होत असतानाच एकीकडे अवकाळी पावसाची बरसात तर दुसरीकडे पसरलेल्या दाट धुक्याने सर्वांना गारव्याचा सुखद दिलासा दिला असला, तरी बदलते वातावरण हे आरोग्यासह शेती आणि फळ बागायतीला हानीकारक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.