दापोली-मंडणगड तालुक्यात अवकाळी पाऊस, आंबा-काजू पिकाचे नुकसान

दापोली-मंडणगडमध्ये मंगळवारी दिवसा दोन वेळा पाऊस बरसला. या बरसलेल्या अवकाळी पावसाने सर्वांची दाणादाण उडवली. त्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले.

दापोली तालुक्यात समुद्र किनारपट्टी भागासह सर्वत्र कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस बरसला. अचानकपणे बरसलेल्या अवकाळी पावसाने सर्वांची दाणादाण उडवली. अनेकांची वाळवणं वाळत टाकलेली भिजली, कोणाचे वाळत टाकलेले कपडे भिजले, कोणाची पावसाच्या बेगमीची फाटी भिजून गेली तर आपल्या घराबाहेर या ना त्या कारणाने बाहेर पडलेल्यांना ओलेचिंब व्हावे लागले. त्यामुळे तालुका ठिकाणी आलेल्यांना परत आपल्या परतीचा मार्ग पत्करावा लागला. त्यामुळे बाहेर पडलेल्यांना योजलेले आपले काम न करताच परत माघारी फिरावे लागले.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या गिम्हवणे येथील हवामान केंद्रावर माहिती घेतली असता पावसाची 2 मिली मिटरची नोंद झाली असल्याचे सांगण्यात आले. याबाबत आंबा किंवा काजू मोहरावर काही परिणाम होईल का ? अशी विचारणा करता पावसाचा काहीही परिणाम होणार नाही, मात्र ढगाळ वातावरण राहिल्यास मोहरावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगण्यात आले असले तरी आज दिवसभरात ढगाळ वातावरण नव्हते. मात्र तालुक्यातील हर्णे, आंजर्ले, आडे, पाडले, उटंबर, केळशी, आंबवली बुद्रुक, रोवले, उंबरशेत, आतगाव आदी भागात पावसाने चांगलेच झोडपले त्यामुळे येथे मात्र आंबा काजू मोहर आणि फळांचे चांगलेच नुकसान होण्याची शेतकरी बागायतदारांकडून भीती वर्तविली जात आहे.

गिम्हवणे-झगडेवाडी येथील पुनम उमेश झगडे या सर्वसामान्य गृह उद्याजिकेने वाळत घतलेल्या पापडांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे, हे नुकसान कसे भरून निघणार या विवंचनेने त्यांना ग्रासले असून तालुक्यात असेच अनेक ठिकाणी घडले असल्याची माहिती मिळत आहे. त्यांना शासन नुकसान भरपाई देणार का ? या निमित्ताने प्रश्न विचारला जात आहे.

एकूणच दापोली तसेच मंडणगड येथे अचानकपणे कडक उन्हाच्या कडाक्यातही बरसलेल्या अवकाळी पावसाने अनेकांचे आर्थिक नुकसान केले आहे. अवकाळी बरसलेल्या पावसामुळे कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधक जरी काहीही नुकसान होणार नाही, असे म्हणत असले तरी आंबवली बुद्रुक येथील प्रगतशिल शेतकरी आणि आंबा बागायतादर मनोज सुरेश केळकर तसेच केळशी परिसरातील बहुतेक आंबा बागायतदारांचे ठाम म्हणणे आहे की, आंबा, काजूला आलेल्या उशिराच्या मोहराला शंभर टक्के बुरशीचा प्रादुर्भाव जडण्याची शक्यता आहे. बोराएवढया कैरीलाही त्याची झळ पोहोचून बागायतदारांचे चांगलेच आर्थिक नुकसान होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे तसेच गुरांची वैरण भिजल्याने वैरण आणायची कुठून याची शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. त्याचप्रमाणे भाजावणीसाठी तोडलेले कवल जमा केलेला पालापाचोला आणि भावणीसाठी ठेवलेल्या सुक्या गवताच्या वरंडी पावसात पार भिजून गेल्याने वाळवी लागून त्याचेही नुकसान होणार आहे, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.