परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी ; पिकांचे किरकोळ नुकसान

परभणी जिल्ह्यासह सेलू, गंगाखेड, मानवत, सोनपेठ, पाथरी, पालम, पूर्णा, जिंतूर आदी आठ तालुक्यांमध्ये काल बुधवारी रात्री 9:30 ते 10 वाजण्याच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. यामुळे  शेतकर्‍यांच्या पिकांचे किरकोळ नुकसान झाले.

मागील तीन ते चार दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करत होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने पाऊस पडणार असल्याची शक्यताही वर्तवली होती. त्याप्रमाणे परभणीत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यामुळे शेतातील ज्वारी, गहू, हरभरा अशा पिकांचे किरकोळ नुकसान झाले आहे. तसेच पुढील दोन दिवस पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. सोनपेठ तालुक्यासह परिसरात अचानक सुसाट वारा आणि अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे किरकोळ नुकसान झाले. यामध्ये गहू, ज्वारी, हरभरा, कापूस इत्यादी पिकांचा समावेश आहे. आधीच खरिपाच्या कापूस, सोयाबीन या पिकांची मशागत करूनही कमी उत्पन्न झाले. त्यातच कापूस कवडीमोल भावाने विकून शेतात हरभरा, ज्वारी पेरणी केली आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानातील चढ-उतार कायम आहे. आजचे कमाल तापमान 29.3 तर किमान 16.2 अंश नोंदवले गले. मात्र बुधवारी तापमानात घट झाली. कमाल तापमान 31.6 तर किमान तापमान 14.6 अंश नोंदवले गेले. तापमानातील चढ-उतारामुळे वातावरणात बदल होत असून या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होत आहे. अधूमधून थंड वारे वाहत असल्याने गारठा निर्माण होऊन सर्दी, खोकला यासारखे आजार बळावले जात आहेत. त्यामुळे परभणीत रुग्णांची संख्या वाढली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या