चित्रा ताई मेरी खास है…उर्फी जावेदचे नवे ट्विट

चित्रविचित्र कपडे घालून माध्यमांसमोर मिरवणाऱ्या उर्फी जावेदने भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्याविरोधात दररोज ट्विट करायला सुरुवात केली आहे. उर्फी जावेदने मंगळवारी सकाळी 2 ट्विट केली असून यातल्या एकामध्ये तिने म्हटलंय की “चित्रा ताई मेरी खास है, फ्युचर मे होनेवाली साँस हैं “.

उर्फीने केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये तिने म्हटलंय की “उर्फी जावेदला दिला त्रास चित्रा अशी कशी ग तू साँस.” ‘र’ ला ‘ट’ जुळवत उर्फी रोज ट्विट करत आहे. तिच्या निशाण्यावर चित्रा वाघ असून रोज नवे ट्विट करत ती जमेल तेवढी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

आपल्या बोल्ड आणि विचित्र कपड्यांमुळे कायम सोशल मीडियावर चर्चेत असणारी मॉडेल उर्फी जावेद आणि भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यातील वाकयुद्ध चांगलंच रंगलं आहे. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचा एक व्हिडिओ ट्विट करत संतप्त प्रतिक्रिया दिली होती. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे उर्फीला बेड्या ठोकण्याची मागणी केली होती. चित्रा वाघ आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या होत्या की, शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत, रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होत आहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये.

यावर उर्फी जावेदने चित्र वाघ यांना उत्तर दिले की, सध्याच्या राजकारण्यांना पाहून वाईट वाटतं. लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला टार्गेट केलं जात आहे. बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष दिला जातोय. समाजामध्ये आणखी काही मुद्दे आहेत, बेरोजगारी, लाखो बलात्काराच्या केसचे निकाल प्रलंबित आहेत त्याचं काय? असा सवाल उर्फी जावेदने केला आहे. माझ्यावर टीका करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या महिलांना खरंच प्रत्यक्ष मदतीची गरज आहे त्यांना तुम्ही का मदत करत नाही? महिलांचं शिक्षण, लाखो बलात्काराची प्रलंबित प्रकरणं यावर आपण का बोलत नाही, असं उर्फी जावेदने म्हटलं आहे.

यानंतर चित्रा वाघ यांनी महिला आयोगालाही या वादात ओढण्याचा प्रयत्न केला होता. वेबसीरिजच्या पोस्टरवरून तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवली; पण तोकडे कपडे परिधान करून त्याचे प्रदर्शन करणाऱया उर्फी जावेदला मात्र महिला आयोग नोटीस पाठवत नसल्याचा आरोप भाजपच्या चित्रा वाघ यांनी केला होता. त्याप्रकरणी महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस बजावली असून दोन दिवसांत स्पष्टीकरण द्या, नाहीतर कारवाई करू असा इशारा आयोगाने दिला होता.

उर्फी जावेदवर कारवाई केली जावी अशी मागणी चित्रा वाघ यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. त्यावर बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी, कुणी काय कपडे घालावेत हा प्रत्येकाचा प्रश्न असून यापेक्षाही मोठे प्रश्न आयोगाकडे आहेत. त्याकडे आम्हाला प्राधान्याने पाहावे लागेल, असे म्हटले होते.

अनुराधा वेबसीरिजच्या पोस्टरवरून तेजस्विनी पंडित हिला महिला आयोगाने नोटीस पाठवली होती असे चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी अशी खोटी माहिती दिल्याबद्दल आयोगाकडून आज त्यांना नोटीस पाठवली गेली. आयोगाने त्यावेळी तेजस्विनीला नाही, तर वेबसीरिजचे दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती, असेही चाकणकर यांनी स्पष्ट केले. गेल्या तीस वर्षांपासून महिला आयोग काम करत आहेत. अनेक कर्तृत्ववान महिलांनी या आयोगासाठी काम केले आहे, असेही त्या म्हणाल्या.

नको तिथे वेळ घालवू नका, महत्त्वाचे बोला

चित्रा वाघ यांनी नको त्या ठिकाणी वेळ घालवण्यापेक्षा महत्त्वाच्या मुद्यांवर बोलले पाहिजे, असा सल्लाही चाकणकर यांनी दिला आहे. संविधानाने प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे उर्फी जावेदचे समर्थन कोण करतेय आणि कोण करत नाही याबद्दल बोलण्याचा अधिकार कुणालाच नाही असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात रोज 34 मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी येतात. ओमानमध्ये पुण्यातील अनेक महिला अडकून पडल्या आहेत. अशा मुद्यांवर चित्रा वाघ यांनी बोलायला हवे आणि आयोगासाठी हे मुद्दे महत्त्वाचे आहेत, असे चाकणकर म्हणाल्या.