योगींच्या मंत्रिमंडळात 18 नवीन मंत्री; पाच जणांना बढती

233

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मंत्रिमंडळ विस्तार केला. मंत्रिमंडळात एकूण 23 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 18 नवीन चेहऱयांचा समावेश असून 5 मंत्र्यांना बढती देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली. योगी सरकारच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या आता 56 झाली आहे.

जातीय आणि प्रांतीय समीकरणे डोळय़ांसमोर ठेवून योगी आदित्यनाथ यांनी नव्या चेहऱयांना संधी दिली आहे. मंत्रिमंडळात पहिल्यांदाच मंत्री बनणारे अनेक आमदार आहेत. चांगल्या कामाबद्दल योगी मंत्रिमंडळातील सात मंत्र्यांना बढती मिळाली आहे. त्यापैकी पाच जणांना स्वतंत्र प्रभार देऊन कॅबिनेट मंत्री बनवले आहे. तर दोघांना स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे.

संघाबरोबरच्या बैठकीत विस्तारावर निर्णय
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत काल आरएसएसच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक झाली. या बैठकीत संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, दोन्ही क्षेत्रीय आणि प्रांतिक प्रचारक उपस्थित होते. या बैठकीत मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 2017 मध्ये योगी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात 47 जणांचा समावेश होता, मात्र त्यानंतर काहींनी राजीनामा दिल्यावर त्यांच्याकडे 40 मंत्री होते.

आपली प्रतिक्रिया द्या