‘संसारिक माणूस झोला घेऊन पळून जाणार नाही’, अखिलेश यांचा पंतप्रधान मोदींना टोला

उत्तर प्रदेशात आज पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पहिल्या टप्प्यात सायंकाळी 5 पर्यंत 57.79 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील भाजपच्या प्रचार सभेत समाजवादी पक्षात घराणेशाही असल्याचा आरोप केला होता. आता यावरच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले आहेत की, ”ज्यांचे कुटुंब असतात, ते लोक झोला उचलून पळून जात नाही.” या निवडणुकीत प्रचारची रंगत वाढत असतानाच भाजप आणि समाजवादी पक्षातील शाब्दिक चकमक देखील वाढली आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

सहारनपूर येथे झालेल्या प्रचार सभेत जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ”आजकाल मी पाहतोय की काही घराणेशाही असणारे लोक जनतेला सतत पोकळ आश्वासने देत आहेत. या लोकांच्या आश्वासनाला बळी पडू नका.” पंतप्रधान मोदी म्हणाले, ”जेव्हा कोणी मोठमोठी आश्वासने देतो, तेव्हा समजून जावा की ही पोकळी आश्वासने आहेत. जेव्हा या लोकांना जनतेने संधी दिली होती, तेव्हा त्यांनी काय केलं, हे विसरू नका.”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

अखिलेश यादव यांचा पलटवार

पंतप्रधान मोदींच्या टीकेवर अखिलेश यादव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अखिलेश यादव म्हणाले आहेत की, ”आम्हाला कुटुंब असल्याचा अभिमान आहे. कुटुंबातील कोणताही सदस्य बॅग घेऊन पळून जाणार नाही आणि कुटुंबाला सोडणार नाही. पंतप्रधानांचे कुटुंब असते तर त्यांना लॉकडाऊनच्या काळात आपल्या घरी पोहोचण्यासाठी अनेक मैल पायी चालत जाणाऱ्या मजुरांची वेदना समजली असती.”