उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकीत भाजपला धक्का? सपाने केला सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा

पश्चिम बंगालच्या निकालासोबतच उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकांच्या निकालानं भाजपला नव्या रणनीतीवर विचार करावा लागणार आहे. राज्यात पूर्ण सत्ता असताना देखील भाजपला पंचायत निवडणुकांमध्ये भाजपला तगडा झटका बसल्याचं बोललं जात आहे. अयोध्या ते मथुरा आणि काशीसह अनेक जिल्ह्यात समाजवादी पक्षाने दावा केला आहे की त्यांनी भाजपचा जबरदस्त पराभव केला आहे. तर भाजपने सपा चा दावा खोटा असल्याचे सांगत आपणच पहिल्या नंबरवर असल्याचा दावा केला आहे. अजूनही पंचायत निवडणुकांचे सर्व निकाल लागलेले नाहीत. मात्र काही जागांवरचे निकाल स्पष्ट आहेत.

प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्येत जिल्हा पंचायतीच्या 40 जागा आहेत. ज्यापैकी 24 जागांवर समाजवादी पक्षाने विजयाचा दावा केला आहे. तर भाजपकडे अवघ्या 6 जागा आल्याचं समजत आहे. तर 12 जागांवर अपक्ष उमेदवार जिंकून आल्याचं कळतं आहे. भाजपला इथे बंडखोरांमुळे फटका बसल्याचं बोललं जात आहे. कारण पक्षानं तिकीट न दिल्यानं इथं 13 जागांवर बंडखोर उमेदवार लढले. तर अपक्ष उमेदवार हे त्यांच्याच सोबत असल्याचा दावा भाजप करत आहे.

पंतप्रधान मोदींच्या वाराणसीत सपा विजयी

पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाराणसीमध्ये भाजपची स्थिती चिंता वाढवणारी आहे. जिल्ह्यातील 40 जागांपैकी 8 जागाच भाजपला जिंकता आल्या आहेत तर ‘सपा’ला 14 जागांवर विजय मिळाला आहे. बसपला इथे 5 जागा मिळाल्या आहेत. अपना दल (एस) ला 3 जागा मिळाल्या आहेत. आप आणि भारतीय समाज पक्षाला 1-1 जागा मिळाली आहे. तर 3 अपक्ष उमेदवार विजयी ठरले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या