अयोध्या, मथुरा,‘यूपी’चे विधान भवन, इमामवाडा ‘इस्लामिक स्टेट’चे टार्गेट

35

सामना ऑनलाईन । लखनौ

मुंब्रा आणि बिजनौर येथून उत्तर प्रदेशच्या ‘एटीएस’च्या पथकाने गुरुवारी मुसक्या आवळलेल्या चौघा संशयित दहशतवाद्यांनी पोलिसांना जबाबात धक्कादायक माहिती दिली आहे. अयोध्या आणि उत्तर प्रदेशातील विधानसभेसहीत अनेक महत्त्वाची ठिकाणे ‘इस्लामिक स्टेट’ची टार्गेट होती. त्यासाठी मार्चमध्ये ‘रेकी’ करण्यासाठी काहीजण लखनौला पाठविण्यात आले होते असे त्यांनी उघड केले.
पाच राज्यांतील ‘एटीएस’च्या पथकांनी संयुक्तरीत्या नुकत्याच केलेल्या कारवाईतून ‘इसिस’चे उत्तर प्रदेश मॉडेल उद्ध्वस्त केले. त्या कारवाईत मुंब्रा येथून नजीम शमशाद आणि बिजनौर येथून मुफ्ती फैजान, तनवीर, एहतेशाम यांना अटक केली आहे. त्यांची चौकशी सध्या एटीएस, आयबी आणि इतर सुरक्षा यंत्रणा करीत आहेत.

त्या चौघांनी काय सांगितले?
– २६ फेब्रुवारी रोजी जालंधर येथे दहशतवाद्यांची प्लॅनिंगसाठी बैठक झाली. त्यात धमाक्यांसाठी मथुरा, अयोध्या, उत्तर प्रदेश विधानसभा, लखनौचा इमामवाडा ही टार्गेट निश्चित करण्यात आली.
– जालंधरच्या बैठकीला एहतेशाम, फैजान हे उपस्थित होते. सध्या आपल्या ‘ग्रुप’मध्ये जास्त सदस्य नाहीत. त्यामुळे मोठे धमाके घडवणे अशक्य होत आहे असा मुद्दा त्या बैठकीत चर्चिला गेला. त्यामुळे अनेक ‘ग्रुप’ची उभारणी करण्याचे ठरवण्यात आले.
– मार्चच्या शेवटच्या आठवड्य़ात उत्तर प्रदेश विधानसभेची रेकी करण्यासाठी काही जणांना ‘रेकी’साठी पाठवले होते. त्यांनी लखनौ येथील इमामवाड्य़ाचीही रेकी केली. तसेच विधानसभेचे फोटो काढून व्हिडीओ चित्रीकरणही केले, पण पोलीस बंदोबस्तामुळे त्यांना विधानसभेत जाता आले नाही असे फैजान याने सांगितले.
– ‘इस्लामिक स्टेट’ हिंदुस्थानात ५ हजार मोबाईल सीम कार्ड ऑक्टिव्हेट केली आहेत. त्यातील बहुतांश कार्डस् बिहार, उत्तर प्रदेशात ऑक्टिव्हेट करण्यात आली आहेत. मोबाईल नंबर बदलत त्यावरून संभाषण केले जाते.

आपली प्रतिक्रिया द्या